मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी वार्षिक परीक्षा व दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी आयोजित करण्याची सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) करण्यात आली होती. यामुळे राज्यातील शाळा एप्रिलमध्ये सुरू राहणार आहेत. या निर्णयास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विरोध केला आहे. महामंडळाचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
विदर्भातील उन्हाळा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक
विदर्भातील कडक उन्हात २५ एप्रिलपर्यंत प्राथमिक शाळा सुरू ठेवणे चुकीचे आहे. कारण विदर्भात उन्हाचा पारा वाढलेला असतो. त्यामुळे हा प्रकार विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे.
शाळाअंतर्गत परीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाचे आहेत. पूर्ण एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचा आदेश चुकीचा आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांना वारंवार पत्र पाठवले आहे. सरकारच्या आदेशानुसार २ ते २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्राथमिक शाळा २०० दिवस आणि उच्च प्राथमिक शाळा २२० दिवस घ्यायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शाळांचे दिवस पूर्ण झाले आहेत. मग २२ एप्रिलपर्यंत शाळा का सुरू ठेवायच्या आहेत, असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे.
सरकारच्या निर्णयामुळे मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी आणि प्राथमिक शाळेच्या लहान विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा संपणार आहे. परीक्षा संपतील त्याच दिवशी पेपर तपासायचे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. मोठ्या शाळांत हे कसे शक्य होणार? असा प्रश्न महामंडळाने विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. कोर्टाने यापूर्वी निर्णय दिला आहे की, विदर्भातील तापमान पाहता शाळा प्रशासनाने निर्णय घ्यावा. त्यानंतर सरकारने पत्रक काढले होते. स्वतः काढलेले पत्रक सरकारच विसरले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.