कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ८६ कोटींचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ८६ कोटींचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली.

सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे. आतापर्यंत १३ लाख ७० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. सगळी प्रक्रिया व्यवस्थित सुरू असून जे पात्र शेतकरी आहेत, यापैकी प्रत्येक शेतकऱ्याची नीट ई-केवायसी होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्यांनी नियमित कर्ज भरलेले आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही प्रोत्साहनपर ५० हजार रुपये वर्ग केले जातील, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमाला फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच अन्य मंत्री आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, यापूर्वी ७ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींचे वितरण करण्यात आले होते. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील १२ लाख ५८ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील विभागनिहाय कर्जमुक्ती

विभाग - शेतकऱ्यांची संख्या - वितरित निधी

अमरावती - १ लाख ४५ हजार ८०८ - १ हजार २०८ कोटी

नाशिक - ८४ हजार ८१३ - ७५६ कोटी

छत्रपती संभाजीनगर - ३ लाख २ हजार २७३ - २,२८४ कोटी

पुणे - ४९ हजार २२४ - ४१७ कोटी

नागपूर - ४४ हजार ८६४ - ३६६ कोटी

कोकण - ९ हजार ५४ - ५४ कोटी

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कायदेशीर प्रक्रियेत कोणालाही खोडा घालण्यास मुभा नाही - उच्च न्यायालय

यूपीआयची आज दशकपूर्ती; दहा वर्षांत व्यवहारात १३ हजार पटीने वाढ

भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा

भारत आणि रशिया व्यापार सहकार्य वाढणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर-पुतीन भेट

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल