मुंबई : राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन, कार आणि दुचाकी धुण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर बंदी घालण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. महानगरांमधील वाहन धुलाई केंद्रे आणि निवासी गृहनिर्माण सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करून वाहने धुण्यास मनाई करण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात असून, राज्य सरकार लवकरच सर्व महापालिकांना यासंदर्भात मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी करणार आहे. महसूल मंत्री आणि राज्य सरकारच्या दुष्काळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले की, ‘निर्बंध निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिकांना आवश्यक निर्देश दिले जातील’.प्रस्तावित निर्बंध व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांसह निवासी सोसायट्यांनाही लागू होणार आहेत. आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याची बचत करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर
राज्य सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ६७.८९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ९५.३० टक्के होता. त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, मुंबईत नागरी कामांसाठी पाण्याच्या वापराबाबतही चर्चा सुरू आहे. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेचा ८.२५ कोटी रुपयांचा रस्ते धुलाई प्रस्ताव मागील महिन्यात पुन्हा पुढे आला होता. या कामासाठी पुनर्वापर केलेले पाणी वापरण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते.