मुंबई : राज्याच्या विकास कामांमध्ये योगदान देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची देयके अदा करण्यासाठी सुमारे ९,७०० कोटी वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित देयकांसाठी निधीची मागणी करण्यात आली असून ती प्राप्त होताच ती देण्यात येतील. तसेच कंत्राटदारांच्या विविध अडचणींवरही सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली.
कंत्राटदारांची प्रलंबित देयके देण्यासाठी निधी वितरित केल्याबद्दल व विविध अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलल्याबद्दल राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांचे आभार मानून धन्यवाद दिले.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने प्रलंबित देयके अदा करणे तसेच इतर विविध अडचणींसंदर्भात मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (इमारती) शरद राजभोज, सचिव (रस्ते) यांच्यासह राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, महासचिव राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
४८०० जणांची १०० टक्के देणी दिली
सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा केली जात आहे. एक कोटींच्या आतील लहान कामांशी संबंधित सुमारे ४८०० कंत्राटदारांची देयके शंभर टक्के अदा करण्यात आली आहेत. तसेच उपलब्ध निधीचे तातडीने वितरण करून प्रलंबित देयकांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इमारत दुरुस्ती कामांची देयके अदा करण्यासाठी वित्त विभागाकडे मागणी केली आहे. निधी मिळताच तातडीने ती अदा करण्यात येतील, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.