बेळगावी : कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) चालकांना शुक्रवारी रात्री धक्काबुक्की करून काळे फासण्यात आल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, पुढील अनिश्चित कालावधीसाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्याचे निर्देश राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले आहेत.
एमएसआरटीसीचे चालक भास्कर जाधव यांना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली तसेच बसला काळेही फासले. एसटीचालकाला कन्नड येते का? असे विचारत कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला आणि बसला काळे फासण्यात आले. मात्र कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी या एसटीच्या चालकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची परिणती आंतरराज्यीय बससेवा तात्पुरती खंडित करण्यात झाली आहे. बेळगावहून महाराष्ट्राला जाणाऱ्या बसेस आता सीमेजवळ असलेल्या कोगनोली चेकपॉइंटपर्यंत धावत आहेत, तर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस कागल तालुक्यापर्यंत सेवा देत आहेत.
या नाट्याचा पहिला अंक बेळगावीत घडला. शुक्रवारी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावी येथे मारहाण करण्यात आली होती. मराठी येत नसल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा दावा कंडक्टर महादेवप्पा मल्लाप्पा हुक्केरी यांनी केला होता. सुळेभावी गावात एक महिला तिच्या पुरुष साथीदारासह बसमध्ये चढली आणि ती मराठीत बोलत होती. मला मराठी येत नसल्याचे सांगून त्यांना मी कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. मला मराठी येत नाही, असे सांगताच महिलेने मला शिवीगाळ करून मराठी शिकावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर अचानक मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला, अशी माहिती कंडक्टरने दिली होती.
या घटनेनंतर कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावरील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला केला. यावेळी कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटीचालकाला कन्नड येते का, अशी विचारणा करत मारहाण केली. त्यानंतर चालकाला आणि बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. मात्र आता कानडी कंडक्टरने केलेला गुन्हा लपवण्यासाठी कानडी संघटनांकडून मराठी भाषिकांना टार्गेट करण्यात आले आहे.
सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी या सगळ्या प्रकाराबाबत व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे. काल बेळगावमध्ये मारहाळ गावाच्या आसपास बसमध्ये अल्पवयीन भाऊ-बहीण प्रवास करत होते. त्यावेळी मुलीने कंडक्टरकडून दोन तिकिटे मागितली. पण भावाचा पास असल्याने तिने एकच तिकीट द्या, असे सांगितले. यावर कंडक्टरने त्या मुलीला शिवीगाळ केली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले. या सगळ्या प्रकरणानंतर तिथल्या लोकांनी कंडक्टरला जाब विचारला. त्यांनाही कंडक्टरने उद्धटपणे उत्तर दिली. त्यामुळे नागरिकांनी त्याला चोप दिला.
या सगळ्या प्रकारानंतर कानडी संघटना रस्त्यावर उतरल्या. या घटनेनंतर आपला काळे कृत्य बाहेर येईल म्हणून कंडक्टरने याला वेगळे वळण देण्याचे काम केले. कंडक्टरने मला मराठी बोलता येत नाही, असे म्हटल्यानंतर लोकांनी मारहाण केली, असे सांगितले. या घटनेची शहानिशा न करता कानडी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत त्या कंडक्टरवर गुन्हा दाखल केला आहे, असे शुभम शेळके म्हणाले.
आम्ही बांगड्या भरल्या नाहीत - सरनाईक
गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही, तुमच्या बसही महाराष्ट्रात येत असतात. वाद वाढायला नको. आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
कर्नाटकच्या बसवर फडकावला भगवा ध्वज
बेळगावीत महाराष्ट्राच्या बसचालकाला काळे फासल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरली, तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला सज्ज इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवा ध्वज फडकावला.
पुण्यातही पडसाद
कर्नाटकामध्ये मराठी बसचालकाला झालेली मारहाण तसेच बसला काळे फासण्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसेस रोखल्या आणि त्यावर काळे फासले. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यादरम्यान त्यांच्यात झटापट देखील झाली. महाराष्ट्र सरकारने या विषयात लक्ष घालावे अन्यथा कन्नडिगांच्या अन्यायाविरोधात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सरनाईक यांनी चालकाशी साधला संपर्क
कर्नाटक शासन याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाशी चर्चा करत नाही, तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील, असे आदेश सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. सरनाईक यांनी जखमी बसचालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.