मुंबई : राज्यात पावसाचा कहर सुरूच असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. रस्ते व शहरांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. पाथर्डी तालुक्यात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता परिसरातील पाऊस ओसरला असला, तरी घरांत चिखलाचे साम्राज्य झाले असून अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेले आहे.
पुणे शहरात मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. मार्केट यार्डमधील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला, फळे आणि फुले वाहून गेली. यामुळे विक्रेते व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील भाजी आणि फळांच्या बाजारात गुडघाभर पाणी साचले आहे.
पाझरतलाव फुटला
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राक्षसवाडी येथे पाझरतलाव फुटल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचा फटका जरंडी, बनोटी, बोरमाळ तांडा या गावांना बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राहत्या घरांमध्येही पाणी शिरले. यामुळे संसारोपयोगी वस्तूंसह धान्य पाण्यात भिजले.