महाराष्ट्र

महाराष्ट्राचा ९५ टक्के भाग मान्सूनने व्यापला; विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सोमवारी मान्सूनने महाराष्ट्राचा ९५ टक्के भाग व्यापला असून, पुढील दोन दिवसांत मान्सून पूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, दक्षिण गुजरातच्या भागावरील या क्षेत्राची तीव्रता वाढून, त्याचे येत्या २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे.

Swapnil S

पुणे : विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सोमवारी मान्सूनने महाराष्ट्राचा ९५ टक्के भाग व्यापला असून, पुढील दोन दिवसांत मान्सून पूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, दक्षिण गुजरातच्या भागावरील या क्षेत्राची तीव्रता वाढून, त्याचे येत्या २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे. तसेच हे क्षेत्र उत्तर पश्चिमेच्या दिशेने प्रवास करणार आहे. याच्या प्रभावामुळे मंगळवारी मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

२६ मे नंतर राज्यातून मान्सूनने ब्रेक घेतला होता. गेले चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होत असून, त्यामुळे मान्सूनला गती मिळाली आहे. संपूर्ण उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग व्यापत त्याने गुजरात, मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय छत्तीसगढ आणि ओरिसाचा आणखी काही भाग वाऱ्यांनी व्यापला आहे. वेरावल, भावनगर, वडोदरा, खारगोन, अमरावती, दुर्ग, भारगढ, चांदबली, बालूरघाट अशी मान्सूनची रेषा आहे.

कोकण आणि लगतच्या भागावर असलेली हवेची द्रोणीय स्थिती सध्या दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागावर आहे. यातच अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वाऱ्यात वाढ झाल्याने सोमवारी कोकणासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा मारा अधिक आहे.

संगमेश्वर, राजापुरात पावसाचे थैमान; अर्जुना, कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी गाठली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला असून लांजा, राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्वर तालुक्यात पूरस्थिती सारखे चित्र निर्माण झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले. काही ठिकाणी अंतर्गत रस्ते वाहतूक बंद पडली. राजापूरमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने रस्तेही जलमय झाले. मुंबई महामार्गावरील मोठ्या पुलावर पाणी आल्यामुळे राजापूर स्टेशनकडे जाणारा मार्ग सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत बंद पडला होता. संध्याकाळी पाऊस कमी झाल्यामुळे राजापूर स्टॅन्डवरून रेल्वे स्टेशनला जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली.

लांजा तालुक्यातील वखेड घाटात सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास दरड कोसळल्याने लगतची संरक्षक भिंतही कोसळली. त्यामुळे या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. दरड उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. संगमेश्वर तालुक्याला पावसाने झोडपले असून शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. महामार्गावरील रस्त्यालगतची दुकाने पाण्याने वेढली आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पूरस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. गुहागर व चिपळूणमध्ये सुद्धा पाण्याची पातळी वाढल्यामुळे सखल भाग जलमय झाला होता.

मुसळधार पावसामुळे कराड- चिपळूण मार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारपासून पूर्णपणे ठप्प झाली होती. कोयना नगर पाटणजवळील वाजेगाव येथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी काढण्यात आलेला रास्ता पाण्याच्या तडाख्याने वाहून गेला. परिणामी वाहतूक पूर्णपणे बंद झाली.

दापोली-दाभोळ मार्गावर झाड पडले

दापोली-दाभोळ मार्गावर मुसळधार पावसामुळे भलेमोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र युद्धपातळीवर झाड हटवून रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video