महाराष्ट्र

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; राज्याचा अर्थसंकल्प २८ जूनला

Swapnil S

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या २७ जूनपासून सुरुवात होत असून १२ जुलैपर्यंतचा अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कामकाज होणार असून त्यानंतरचे दोन आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २७ जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनला राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

चौदाव्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून विविध समाजघटकांना खूश करण्यासाठी विविध सोयीसवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी शुक्रवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या पक्षाचे कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील सदस्य आहेत. मात्र, यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. अजित पवारांसह हे दोघेही बैठकांसाठी पुण्यात होते, तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये अजित पवार गटाकडून आमदार सतीश चव्हाण सदस्य आहेत. मात्र, तेही बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात पार पडले होते. या अधिवेशनात एप्रिल ते जुलै २०२४ या चार महिन्यांसाठी लेखानुदान मांडून ते मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे आता या अधिवेशनात सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडी जोशात आहे, तर महायुतीला त्यातही भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मागील दोन निवडणुकीत मिळालेल्या कमी जागांमुळे भाजपकडून त्यांना सातत्याने हिणवले जात होते. परंतु, आता या अधिवेशनात काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभेची निवडणूक एकदिलाने लढल्याने ही एकजूट अधिवेशनातही दिसण्याची शक्यता आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत