मुंबई : मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च विभागाच्या प्रधान सचिवांकडून लेखी हमी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी संप मागे घेतला आहे. राज्यभरातील सुमारे ३०,००० परिचारिका १८ जुलैपासून संपावर होत्या. रिक्त पदांवरील तत्काळ भरती, कंत्राटी भरती बंद करणे आणि सातव्या वेतन आयोगाचे समान लाभ सर्व परिचारिका कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यापूर्वी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही लेखी हमी मिळेपर्यंत संप मागे घेण्यास संघटनेने नकार दिला होता. या संपाला राज्य शासन गट-‘ड’ (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघ यांचाही पाठिंबा मिळाला होता.
या संपादरम्यान अनेक मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या काळात मुंबईत सुमारे २,००० लहान-मोठ्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून आमच्या मागण्यांबाबत लेखी हमी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूर, २४ जुलैपासून राज्यव्यापी संप मागे घेत आहे. - सुमित्रा तोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना