काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं  
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंबद्दल काँग्रेसला आदर : प्रियांका गांधी; जातनिहाय जनगणना करण्याचे मोदी-शहांना खुले आव्हान

शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी असली तरी काँग्रेसला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शनिवारी शिर्डीच्या निवडणूक प्रचार सभेत जाहीर नामोल्लेख केला.

Swapnil S

शिर्डी/कोल्हापूर : शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी असली तरी काँग्रेसला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगून काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शनिवारी शिर्डीच्या निवडणूक प्रचार सभेत जाहीर नामोल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यासपीठावर उभे राहून सांगावे की, ते जातनिहाय जनगणना करतील आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवतील, असे खुले आव्हान प्रियांका गांधी यांनी दिले. प्रियांका गांधी यांनी' जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिर्डी के साईबाबा की जय,' अशा घोषणा शिर्डीतील सभेत दिल्या. तसेच महाराष्ट्राची भूमी साधू संतांची आहे असे सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा यांचा आवर्जून उल्लेख केला.

छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले. तथापि, ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणमधील महाराजांचा पुतळा तर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. भाजप सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते; परंतु शिवरायांचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असे प्रियांका गांधी यांनी ठणकावून सांगितले.

बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला!

नरेंद्र मोदी यांची भाषण ऐकली की दुःख होते. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. मोदी व्यासपीठावर येतात. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला.

तुमचे धाडस कसे होते ?

प्रियांका गांधी कोल्हापूरच्या सभेत कडाडल्या. त्या म्हणाल्या, राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगितले जाते. तथापि, आरक्षण तर राजीव गांधी यांनी आणले. महाराष्ट्राचे सरकार तुम्ही खरेदी केले, तोडले आणि मोदी तुम्ही संविधानची गोष्ट बोलता ? भ्रष्टाचारावर बोलण्याचे तुमचे धाडस कसे होते ?

राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याच्या आरोपाचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमिटरची पदयात्रा काढून आजही संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. त्यांच्यावर मोदी शाह हे संतांच्या भूमीतून खोटे आरोप लावत आहेत. भाजप, मोदी व शहा हे राहुल गांधी यांना घाबरले आहेत असेही प्रियाका गांधी यांनी नमूद केले.

महाराष्ट्र मजबूत करण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींची पोलखोल करत प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंडित नेहरुंनी देशातील विविध राज्यात संस्था उभा केल्या, धरणे बांधली, आयआयएम, आयआयटी स्थापन करताना कधीच भेदभाव केला नाही. मात्र, पण मोदी सरकारने भेदभाव केला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला पळवले, टाटा एअरबस प्रकल्प पळवला, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पळवला, अशी यादी वाचून महाराष्ट्रातील उद्योग व रोजगार मोदी सरकारने पळवल्याचे सांगितले. मोदी सरकारमुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण व महिला मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. ११ वर्षापासून सत्तेत असताना भाजप व नरेंद्र मोदींना महिला, तरुण, शेतकरी यांची आठवण झाली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी