महाराष्ट्र कॅडरचे १९८९ बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल पुन्हा एकदा राज्याच्या सेवेत रुजू होणार आहेत. केंद्र सरकारने बुधवारी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयातील दिव्यांग व्यक्ती विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अग्रवाल यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये परत बोलावले. ते पुढील आठवड्यात महाराष्ट्राचे पुढील मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार यांचा कार्यकाळ नोव्हेंबर अखेरीस संपत आहे, त्यांच्या जागी अग्रवाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.
राजेश कुमार हे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी सुजाता सौनिक यांच्या निवृत्तीनंतर जून महिन्यात मुख्य सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. ३० ऑगस्ट रोजी ते निवृत्त होणार होते, मात्र त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली, जी ३० नोव्हेंबरला संपणार आहे. त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वीच राज्य प्रशासनाने सर्वोच्च प्रशासकीय पदावर सुरळीत कार्यभार हस्तांतरण होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
कोण आहेत राजेश अग्रवाल?
अग्रवाल हे महाराष्ट्र कॅडरचे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असून ते सुमारे दशकभरापासून केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यांनी वित्तीय सेवा, पेट्रोलियम, आदिवासी व्यवहार, कौशल्य विकास आणि सामाजिक न्याय अशा अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात ते एक सुधारक, गतिशील आणि परिणामाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले गेले.
महाराष्ट्रात पूर्वीच्या कार्यकाळात अग्रवाल यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. तसेच माहिती तंत्रज्ञान, लेखा व कोषागार अशा महत्त्वाच्या विभागांमध्येही पदभार सांभाळला. माहिती तंत्रज्ञान सचिव म्हणून त्यांच्या कार्यकाळात राज्यातील ई-शासन प्रणालीच्या आधुनिकीकरणाला गती मिळाली. त्यांच्या नियुक्तीला एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, केंद्र सरकारमधील विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अग्रवाल नोव्हेंबर २०२६ मध्ये होणार निवृत्त
अग्रवाल नोव्हेंबर २०२६ मध्ये निवृत्त होणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाला स्थैर्य आणि सातत्य देण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीमुळे १९८९, १९९० आणि १९९१ बॅचमधील काही वरिष्ठ अधिकारी नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.