नागपूर : महाराष्ट्रासाठी १.५० लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे २०२६ पासून सुरू होतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, विधान परिषदेच्या शताब्दी समारंभासाठी नागपूरचे खासदार गडकरी विधानमंडळ संकुलात आले होते. तेव्हा विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, तीन महिन्यांत राज्यातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) १६,३१८ कोटी रुपयांत नवीन पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग उभारणार असून त्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) प्रक्रिया पूर्ण केली आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ दोन तासांवर, तर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर प्रवासाचा वेळ अडीच तासांवर येईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर ४, २०७ कोटी रुपयांत उभारण्यात येणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत रस्त्याचे भूमिपूजन केले जाईल. तसेच, हडपसर-यवत उन्नत रस्त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून निवडणुकीनंतर कामाला सुरुवात होईल.
महाराष्ट्रासाठी एकूण १.५० लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे २०२६ पासून सुरू होतील. यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाला ५० हजार कोटी रुपयांची कामे देण्यात आली आहेत, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे दरम्यान नवा दूतगती महामार्ग
पुणे विभागासाठी ५०,००० कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांत बांधकाम सुरू होईल. विद्यमान पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला समांतर १५ हजार कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचा नवीन द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार असून त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दीड तासांवर येईल. मुंबई-पुणे-बंगळुरू प्रवासाचा वेळ साडेपाच तासांवर येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.