महाराष्ट्र

...तर वाळू डेपो रद्द करणार! राज्यातील ५७ वाळू डेपोंना नोटीस; कृत्रिम वाळू धोरण लवकरच

राज्यातील वाळू डेपोंतील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील सर्व ५७ वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील वाळू डेपोंतील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील सर्व ५७ वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला असून , नियमांचे पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नदीच्या वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू (एम सॅंड) धोरण लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वाळू डेपोंतील गैरप्रकार आणि जनतेच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाळू वाहतुकीसंदर्भातील नियमांचे पालन न करणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव, आणि डेपो मधून प्राप्त होणाऱ्या रेती मध्ये होणारी टाळाटाळ यांसारख्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व डेपोंच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “निकषांनुसार काम न करणारे डेपो रद्द करण्यात येतील. वाळूसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष डेपो तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. विशेषतः नागपूरमधील १० डेपोंना नियमांचे उल्लंघन केल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या डेपोना सात दिवसांत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.

पुढच्या मंत्रिमंडळात कृत्रिम वाळूचा प्रस्ताव

राज्य सरकारने नुकतेच रेती निर्गती धोरण लागू केले आहे, ज्यामुळे वाळूच्या व्यवहारांवर कडक नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून आता कृत्रिम वाळूसाठी (एम सॅंड) स्वतंत्र धोरण आणण्याची तयारी सुरू आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मंजुरीसाठी सादर केले जाईल. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर उभारून एम सॅंड तयार केले जाईल. यामुळे नदीच्या वाळूची गरज कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल.” या धोरणामुळे बांधकाम क्षेत्राला परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध होईल आणि अवैध वाळू उत्खननाला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी