“एखादा आमदार टोकाचं वक्तव्य तेव्हाच करतो जेव्हा..."; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर संजय शिरसाटांचा पलटवार  
महाराष्ट्र

“एखादा आमदार टोकाचं वक्तव्य तेव्हाच करतो जेव्हा..."; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर संजय शिरसाटांचा पलटवार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शेयर केलेल्या व्हिडिओवरून राजकरण तापलेलं असताना मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. महेंद्र दळवींचा व्हायरल व्हिडिओ एआयने तयार केलेला मॉर्फ असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला.

किशोरी घायवट-उबाळे

राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार (दि.८) पासून नागपूरात सुरू झाले आहे. अशातच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.९) एक व्हिडीओ शेयर केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगच्या व्हिडिओनंतर दानवेंचा हा व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय. या व्हिडीओवरून राजकारण तापत असताना मंत्री संजय शिरसाट यांनी आज यावर प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीकेची झोड उठवली.

मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानभवनात प्रतिक्रिया देताना सांगितले की, "सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला आमदार महेंद्र दळवी यांचा कथित 'पैशांच्या बंडलांचा' व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेला मॉर्फ व्हिडिओ असल्याची शक्यता आहे.

एआयच्या मदतीने बनवलेला मॉर्फ व्हिडीओ

पुढे ते म्हणाले, “मी दळवींचा व्हिडिओ पाहिला आहे. तो एआयच्या मदतीने बनवलेला मॉर्फ व्हिडीओ दिसतो. स्वतः महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले आहे की ते नागपुरात आहेत आणि तो व्हिडिओ कोणी व कुठे बनवला, याची त्यांना माहिती नाही.”

इतक्या टोकाचं वक्तव्य तेव्हाच करतो जेव्हा...

दळवी यांनी यापूर्वी विधान केले होते की, “कोणीही पुरावे घेऊन पुढे आल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईन.” यावर भाष्य करत शिरसाट म्हणाले, “एखादा आमदार इतक्या टोकाचं वक्तव्य तेव्हाच करतो जेव्हा त्याच्याकडे पूर्ण आत्मविश्वास असतो. त्याशिवाय कोणीही असं बोलू शकत नाही.” विरोधकांवर निशाणा साधत शिरसाट म्हणाले, “हे लोक एआयद्वारे कोणत्याही आमदाराचा व्हिडिओ बनवू शकतात.”

नेमकं प्रकरण काय?

"या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल मंगळवारी (९ डिसेंबर) अंबादास दानवेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला. अंबादास दानवे यांनी या ट्विटमध्ये कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नाही. पण हा व्हिडिओ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा असल्याची चर्चा सुरू होती. म्हणूनच, आमदार महेंद्र दळवी यांनी यावर उत्तर दिले.

ब्लॅकमेल करणारा आणि सुपारीबाज नेता

आमदार महेंद्र दळवी म्हणाले, "अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. मी व्हिडीओत असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे हा ब्लॅकमेल करणारा आणि सुपारीबाज नेता आहे."

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले