संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

एसटी उत्पन्नाचा आलेख घसरलेलाच; उद्दिष्ट साध्य करणारे ३१ पैकी फक्त दोनच विभाग राज्यात

एसटीच्या उत्पन्नाचा आलेख दिवसेंदिवस घसरत चालला आहे. एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांप्रमाणे प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६५ लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते.

Swapnil S

मुंबई : एसटीच्या उत्पन्नाचा आलेख दिवसेंदिवस घसरत चालला आहे. एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांप्रमाणे प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६५ लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २९ कोटी ८० लाख रुपये इतके उत्पन्न प्रतिदिन मिळाले असून ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश आले असून साडेतीन ते चार कोटींनी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुचकामी ठरलेल्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाहीतर डोलारा कोलमडून पडेल, अशी भीती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी वर्तविली आहे.

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही व्हिजन राबविले जात नसून ऐन उन्हाळी हंगामात एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतील आकडेवारीतून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून आले होते. पण त्यानंतरही प्रवासी संख्या व उत्पन्नवाढीसाठी काहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. अनेक विभागात प्रवासी संख्यावाढीसाठी संधी उपलब्ध असताना वाहतुकीशी संबंधित विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी निव्वळ दिवस भरताना दिसले. परिणामी उत्पन्न व प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ झाली नाही. १ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत उद्दिष्टाप्रमाणे दिवसाला साधारण तीन ते चार लाखांनी उत्पन्नात घट झाली असून प्रवासी संख्यासुद्धा गतवर्षीच्या तुलनेत दीड लाखाने कमी झाल्याचे दिसून आले आहे.

ऐन उन्हाळी हंगामात व भाडेवढीनंतरही उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली असून आता उन्हाळी हंगाम फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. या महिन्यात एसटीच्या एकूण ३१ विभागांपैकी फक्त कोल्हापूर व सांगली या दोनच विभागांना अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश आले असून आता यापुढे फक्त एक महिना उत्पन्नवाढीची संधी आहे.

चालक-वाहकांच्या मेहनतीवर पाणी

उष्णतेचा पारा वाढला असताना सुद्धा जीवाची पर्वा न करता चालक-वाहक व इतर कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. अधिकारी मात्र अपेक्षित प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ स्वतः विशेष लक्ष घालून एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा. किंबहुना कामचुकार अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली पाहिजे, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video