महाराष्ट्र

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

महाराष्ट्राची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून भविष्यात अंगणवाडी केंद्रांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. बालविवाह, हुंडा प्रथा, घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून भविष्यात अंगणवाडी केंद्रांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. बालविवाह, हुंडा प्रथा, घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले.

महाराष्ट्रात मिशन वात्सल्य व मिशन शक्ती या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासनाकडून समन्वय होणे आवश्यक आहे. राज्य कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केली.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी विविध राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

विकसित भारताच्या दृष्टीने महिला व बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासंदर्भात तसेच योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्पष्ट मानव संसाधन धोरण, पुरेशा पायाभूत सुविधा, आर्थिक समतोल, न्याय्य वेतन, विश्वसनीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि अनुदान यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

राज्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, यासाठी अंगणवाडी केंद्रांची संख्या शहरी आठ हजारांहून अधिक वाढविणे आवश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी केली.

अंगणवाडी सेविकांच्या मूलभूत प्रशिक्षण व सुविधांवर भर देण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी 'मिशन शक्ती' अंतर्गत वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाइन १८१, बेटी बचाओ-बेटी पढाओ, नारी अदालत यांसारख्या योजना सुरू आहेत. त्या अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी भाडेकरार, जिल्हा संरक्षण कक्ष व हेल्पलाइनसाठी स्वतंत्र वाहने असणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पिंक ई-रिक्षा आणि आदिशक्ती अभियान याव्दारे महिलांच्या प्रगतीसाठी राज्याने ठोस पावले उचलली आहेत. बालकांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या मिशन वात्सल्य योजनेसाठी जिल्हा संरक्षण कक्षांना वाहने, वेतनमानात सुसंगती, पुरेसा निधी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असल्यास योजना अधिक प्रभावीपणे राबविता येईल.

केंद्राने अधिकचा निधी द्यावा !

राज्यात महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी ठोस धोरणे व योजना कार्यरत आहेत. त्यांचा परिणामकारक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक पुरेसा निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र या योजनांच्या अंमलबजावणीत देशात आदर्श ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

ओबीसी नेते आक्रमक! २ सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी, १० ऑक्टोबरच्या मोर्चावरही ठाम