महाराष्ट्र

ZP Election Result : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणत्या पक्षाची आघाडी? मतदारांचा कौल कोणाला?

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांतील मतमोजणी कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असून, राज्यभरातून निकालांचे अपडेट्स समोर येत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजता सुरुवात झाली. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांतील मतमोजणी कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असून, राज्यभरातून निकालांचे अपडेट्स समोर येत आहेत.

शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत सुमारे ६७ टक्के मतदान झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या ११ दिवसांत ही निवडणूक घेण्यात आल्याने, या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुका ग्रामीण आणि निमशहरी भागातील जनमत दाखवणाऱ्या असल्याने त्यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.

कोणत्या पक्षाची आघाडी?

दुपारी ११:५० वाजेपर्यंतच्या मिळालेल्या कलांनुसार, भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. नव्या आकडेवारीनुसार भाजप १२५ पैकी ३० पंचायत समिती जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस २० जागांवर, शिवसेना (शिंदे गट) १७ जागांवर, राष्ट्रवादी समाजवादी पक्ष ११ जागांवर, काँग्रेस ८ जागांवर आणि शिवसेना (ठाकरे गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर असल्याची माहिती आहे.

सांगलीत काँग्रेस उमेदवार विजयी

माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात काँग्रेसला पहिला दिलासा मिळाला आहे. सांगली जिल्हा परिषद अंतर्गत पलूस पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला असून, काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड विजयी झाले आहेत. ऋषिकेश लाड हे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे पुतणे आहेत.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आघाडी

सकाळी ११:२० वाजता आलेल्या कलांनुसार, भाजप २५ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस १८ जागांवर, शिवसेना (शिंदे गट) १५ जागांवर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजवादी पक्ष प्रत्येकी १० जागांवर, शिवसेना (ठाकरे गट) ५ जागांवर तर इतर एका जागेवर आघाडीवर होते. यानंतरच्या वेळेत भाजप आणि शिंदे गटाच्या आघाडीत वाढ झाल्याचे दिसून आले.

निवडणूक पुढे का ढकलली?

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे मतदान ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले. या काळात सर्व राजकीय पक्षांना प्रचार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

राज्यात ६८.२८% मतदानाची नोंद

या निवडणुका पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये पार पडल्या. निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. सुमारे १.२८ लाख कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते आणि २५,४७१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २.०८ कोटी मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये १.०६ कोटी पुरुष, १.०१ कोटी महिला आणि ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. राज्यात ६८.२८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

मतदानाची टक्केवारी

मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिले असता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदान झाले तर त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये ७४.४५ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ७२.६९ टक्के मतदान झाले आहे. काही जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह तुलनेने कमी असला तरी एकूणच ग्रामीण भागातील सहभाग लक्षणीय ठरला आहे.

संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल स्पष्ट

आज संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल स्पष्ट होतील. या निकालांतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांची ताकद स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांचे निकाल राज्यातील ग्रामीण सत्ताकेंद्रांची दिशा ठरवणारे ठरणार आहेत. विविध पक्षांतील फूट, नवीन राजकीय समीकरणे आणि नेतृत्वबदलांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे संकेत देणार आहेत.

Mumbai : सेंट्रल पार्कला गती; महालक्ष्मी रेस कोर्सवरील उद्यानासाठी रिलायन्सकडून आर्किटेक्टची नियुक्ती

मुंबईत वाहतूक कोंडी कर लागू करा! मकरंद नार्वेकर यांचे पालिका आयुक्तांना पत्र

Mumbai : अपघाताचा वाढता धोका! कचऱ्याची जुनी वाहने रस्त्यावर आणू नका, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे निर्देश

Navi Mumbai : ५२७ पोलीस शिपाई पदांसाठी ५०,४६० अर्ज; ११ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी

Mumbai : सर्व लोकल एसी होण्यास सहा वर्षे लागणार; एमआरव्हीसीकडून निविदा प्रक्रिया सुरू