महाराष्ट्र

महाविकास आघाडी ४० जागा जिंकेल -संजय राऊत यांचा दावा

Swapnil S

मुंबई : भाजप लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचा दावा करत असला तरी तो  हवेत राहणारा पक्ष असून तो जनतेचा पक्ष नाही. तो दोन पक्षांच्या कुबड्यांवर उभा आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा जिंकेल. एवढ्या जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात महायुतीला १९ ते २१ जागा तर महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘आम्ही जी तयारी केली आहे, ती पाहता किमान ३५ ते ४० जागा लोकसभेच्या जिंकू, एवढ्या जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे. आम्ही सर्व्हे करत नाही पण आमचे ४० प्लस हे मिशन नसून आत्मविश्वास असल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजप प्रत्येकवेळा रामलल्लाच्या नावाने मते मागतात. जणू राममंदिराची मालकी यांच्याकडेच आहे. अशापद्धतीने त्यांचे राजकारण सुरु आहे. राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन होताच अयोध्येत जाऊन १ कोटी रूपयांची देणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे. त्यामुळे रामलल्ला हे कोणाच्या मालकीचे नाहीत. अयोद्धेचा सातबारा रामाच्या नावावर आहे, भाजपच्या नावावर नाही, असे सांगतानाच भारतीय जनता पक्षाने फेरफार करुन आपले नाव टाकले आहे का?, असा सवालही त्यांनी केला. रामलल्ला कोणाची खासगी संपत्ती नसून  देशाची अस्मिता आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर इंडिया आघाडीत येतील
काँग्रेसचा स्थापना दिवस असल्याने २८ डिसेंबरपर्यंत काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत २८ डिसेंबरनंतर निर्णायक बैठक होईल. या बैठकीत शंभर टक्के निर्णय होईल. प्रकाश आंबेडकर आणि आमची चर्चा सुरू आहे. त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत कोणताच फरक नाही.  या देशामध्ये संविधान टिकावे. लोकशाहीची हत्या होऊ नये. कायदा पायदळी तुडवला जाऊ नये. तसेच मोदींची  हुकूमशाही संपवावी आणि लोकशाही मार्गाने संपवावी, असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत, असेही राऊत म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त