जालना : १९९४ साली शरद पवारांनी आमच्या हक्काचे १६ टक्के आरक्षण ओबीसींना दिले आणि मराठ्यांचे वाटोळे केले. मात्र ज्या शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिले, त्यांच्यासुद्धा उपकार ओबीसी नेत्यांनी ठेवले नाहीत, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली.
एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. जरांगे म्हणाले की, “विजय वडेट्टीवार ओबीसींच्या ३७५ जाती असल्याचा दावा करतात. पण त्यांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसी गरीबांनी यावर चिंतन केले पाहिजे. या लोकांनी ओबीसींना खोटे व बोगस आरक्षण दिले. हे १६ टक्के आरक्षण मराठ्यांच्या हक्काचे होते. ओबीसींचा खरा घात हा येवल्याच्या अलीबाबाने आणि वडेट्टीवार अथवा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी केला.”
“ओबीसींना आमच्याविषयी थोडाही धाक नाही. कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीत. पण या लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ओबीसींनाच पणाला लावले आहे. या लोकांनी ओबीसी संपवण्याचा चंग बांधला आहे,” अशी टीकाही जरांगेंनी वडेट्टीवार यांच्यावर केली.