मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या महिन्यातही त्यांचं उपोषण सुरु होतं, परंतु मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्तीनंतर त्यांनी आपलं आंदोलन १३ जुलैपर्यंत स्थगित केलं होतं. परंतु या काळात सरकारकडून कोणताही निर्णय न झाल्यानं त्यांनी २० जुलैपासून पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं होतं. परंतु आंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी १ वाजता स्थगित केलं आहे. सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १३ आगस्टपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मला हातपाय दाबून सलाईन लावली...
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मला हातपाय दाबून सलाईन लावली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसं केलं. माझं कुणीही ऐकलं नाही. आता सलाईन लागलीच आहे, तर आता उपयोग नाही. सलाईन ही जेवणासारखीच आहे. त्यामुळे आता उपोषणाची मानसिकता राहिली नाही. सलाईन लावली म्हणजे उपोषणाला आता अर्थ नाही. सरकारची दमछाक कमी होईल. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार आहे."
ते म्हणाले की, "सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. सलाईन लावून बेगडी उपोषण करणार नाही. समाजानं सलाईन न लावण्याची परवानगी दिली, तरच आंदोलन पुढे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं."