मराठ्यांचे वादळ धडकणार; 'मुंबईत जाणारच' जरांगेंची घोषणा, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ धडकणार; 'मुंबईत जाणारच' जरांगेंची घोषणा, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आरपार लढाईची वेळ आली असून आपण १९ सप्टेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करू, अशी घोषणा मराठा नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी केली

Swapnil S

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आरपार लढाईची वेळ आली असून आपण १९ सप्टेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करू, अशी घोषणा मराठा नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी केली. यामुळे ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा मराठा आंदोलकांचे वादळ मुंबईवर धडकणार असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या १५ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असे जाहीर केले. हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या चौकटीत राहूनच केले जाईल, कोणीही दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, प्रत्येकाने आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारी मराठा समाजाची महत्त्वाची आणि निर्णायक बैठक जरांगे-पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली. मुंबईला जायचे फायनल झाले आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. मुंबईला येऊ इच्छित नसलेल्या मराठा बांधवांनी मुख्य रस्त्यावर येऊन आंदोलनकर्त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना आशीर्वाद द्यावा, सर्वांनी एकाच मार्गान मुंबईकडे जावे, मार्ग बदलू नये आणि संपूर्ण प्रवासात शांतता व शिस्त पाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांच्या मार्गात अडथळे आणू नयेत. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांनी शांततेत रस्त्यावरच बसावे, पण बॅरिकेड्सला हात लावू नये. आंदोलकांनी पर्यायी मार्ग शोधून मुंबई गाठावी. जर आंदोलकांना रोखले गेले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी फडणवीस यांचीच असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शासनाने ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे अद्याप जात प्रमाणपत्रे दिली नाहीत आणि गॅझेटशी संबंधित मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप करत जरांगे म्हणाले, ही आमची अंतिम लढाई आहे. आता एकाही मराठ्याने घरी बसू नये.

ओबीसींचा विरोध

दरम्यान, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर तातडीने बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावली. प्रत्येकाला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार असून केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या भीतीपोटी बंदी घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणारा शासन निर्णय जारी करावा, ही जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, या मागणीला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे.

हळदी-कुंकू घेऊन जा

अंतरवाली सराटीतील उपस्थित महिला आंदोलकांनी मुंबईला सोबत येण्याची तयारी दर्शवली. या महिलांनी आझाद मैदानऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जावे आणि त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी मांडावी, असा सल्ला जरांगे यांनी दिला. सौभाग्याचे लेणे असलेले कुंकू स्वीकारणार नसतील तर हे कसले हिंदू, असा खोचक सवालही मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

पदयात्रेचा मार्ग

मुंबईकडे जाणाऱ्या आपल्या पदयात्रेचा मार्ग जरांगे यांनी जाहीर केला. १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीवरून निघून १५ सप्टेंबरला बीडमधील पाटोदा, १६ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, १७ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील हडपसर आणि १८ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे ही पदयात्रा मुक्कामी असेल. त्यानंतर नवी मुंबईतील कोपरखैरणेमार्गे १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात पोहोचेल आणि उपोषणाला सुरुवात होईल. पदयात्रेत दररोज सुमारे १०० किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजचे राशिभविष्य, १३ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मंगळागौरीसाठी अनुष्का सरकटेचा मराठमोळा साज; पोपटी नऊवारीत खुललं सौंदर्य

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा सुगंधी केसर मोदक; आताच नोट करा सोपी रेसिपी

Kareena Kapoor : पेस्टल साडीत करीनाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास लूक

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर