छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय जारी झाल्यानंतर फक्त २७ जणांना मराठा प्रमाणपत्र मंजूर झाली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालत यासंदर्भात जाब विचारला.
मराठा आरक्षणासाठी काढलेला 'जीआर' फसवा आहे. त्यातून किती जणांना प्रमाणपत्रे मिळाली, हे सांगा? असा थेट जाब विचारत कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना निवेदन दिले. ओबीसी मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी असलेल्या विखे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती.
विखे पाटील यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची झाडाझडती घेण्यात आली; खिशातील वस्तूंची ही तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता. छगन भुजबळ यांचा ओबीसी मेळावा होत असताना विखे पाटील यांच्या दौऱ्यात इतका मोठा पोलिस बंदोबस्त असण्याची ही पहिलीच वेळ होती.