अंतरवाली सराटी : आम्हाला आता आमच्या न्याय्य हक्कांसाठी विधानसभा लढवावी लागेल, असा निर्धार व्यक्त करत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी, २९ ऑक्टोबरनंतर परिस्थिती पाहून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मराठा समाजातील इच्छुकांना केले. जिथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तिथेच आपले उमेदवार उभे करा. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदारासघांमध्ये अर्ज दाखल करू नका, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
जालना येथील आंतरवाली सराटीत गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “जे कोणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांनी अर्ज भरावेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी मतदारसंघांचा अंदाज घेऊन कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याचा निर्णय देईन. समीकरणे जुळवणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांनी फॉर्म भरून ठेवावेत. पण फॉर्म काढ म्हटल्यावर काढून घ्यायचा. तसे न केल्यास मी त्या मतदारसंघात लक्ष घालणार नाही. आपल्या मागण्या मान्य असणाऱ्यांना मतदान द्यायचे. ३६ मतदारसंघांमध्ये मराठ्यांचे १ लाख मतदार आहेत. ज्या ठिकाणी निवडून येणार नाहीत, तिथे जो आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत बाँडवर लिहून देतील त्याला निवडून द्यायचे अन्यथा सर्व पाडायचे.
"सरकारने मराठ्यांची घरे उन्हात बांधली आहेत. फडणवीस अत्यंत क्रूर माणूस आहे. सरकारने आमच्यावर ही वेळ आणली आहे. मविआ असो की महायुती असो आम्हाला कुणाचेच ऐकायचे नाही. लोकांना दोन्हीकडील राजकीय नेत्यांचा राग येत आहे. मराठा समाजाची काय चूक आहे की, ७० वर्षे तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही. आता या सर्व गोष्टीचा हिशोब होणार," असेही त्यांनी सांगितले.
मला चळवळीतून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्यातील एका नेत्याला ताकद देण्यात आली आहे. गरज पडली तर त्या नेत्यांची नावे समाजापुढे आणली जातील. परंतु, त्यांचे कोणतेही अस्त्र माझ्यावर चालणार नाही. त्यांना मला ठार मारावे लागेल. त्यांच्यापुढे हाच एकमेव पर्याय आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
आम्ही सरकारची वाट लावणार
देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लेकरांच्या माना पिरगळल्यात. आमचे बळी घेऊन पोट भरले नाही, तर जाता-जाता काही जातींना मराठा समाजाच्या नाकावर टिच्चून ओबीसीतून आरक्षण दिले. मात्र, आम्हाला दिले नाही. या सरकारची वाट आम्ही लावणार आहोत. त्यासाठी १० पाऊले आम्ही मागेही जाऊ किंवा पुढेही जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा म्हणजे काय हे दाखवावे लागेल!
गावखेड्यातील ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी आहे. शासनाने आम्हाला निवडणूक लढवण्यास भाग पाडले आहे. आता मराठे म्हणजे काय, हे तुम्हाला दाखवावे लागेल. राजकारणासाठी आमचा संघर्ष नाही, पण आमच्या हक्कासाठी हा संघर्ष सुरू आहे. निवडणुका दरवेळी येत असतात, पण आपण राजकारणासाठी आपला समाज संपवायचा नाही. आपला समाज समुद्रासारखा पसरला आहे. त्याची ताकद दाखवण्याची गरज आहे, असा इशाराही जरांगेंनी दिला.