महाराष्ट्र

बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे योगदान महत्त्वाचे; ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी जीवन व साहित्य’ परिसंवादात उमटला सूर

महाराष्ट्र राज्याबाहेरही अनेक मराठीजन राहतात आणि त्यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे.

Swapnil S

महाराष्ट्र राज्याबाहेरही अनेक मराठीजन राहतात आणि त्यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. मात्र, या मराठी भाषिकांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे, असा सूर ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित्य’ या परिसंवादात उमटला.

परिसंवादात बंगळुरू येथील साहित्यिक डॉ. अनुराग लवेकर, अर्चना मीरजकर आणि पत्रकार मयुरेश वाटवे यांनी महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांचे कर्तृत्व आणि साहित्यावर उमटलेला ठसा यावर सखोल चर्चा केली. महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधव आणि साहित्यिकांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यावरही वक्त्यांनी प्रकाश टाकला.

गोव्याचा साहित्य आणि पर्यटनावरील प्रभाव

पत्रकार मयुरेश वाटवे यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संबंधांवर भाष्य केले. त्यांनी गोव्यातील निसर्गाच्या विनाशाकडे लक्ष वेधले आणि तो साहित्याच्या माध्यमातून प्रतिबिंबित होतो, असे सांगितले. गोव्याचे पर्यटन आणि माध्यमांतील चित्रण यामुळे गोव्याची वेगळी प्रतिमा तयार होत असल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

दक्षिणेतील मराठी साहित्याचा ठसा

डॉ. अनुराग लवेकर यांनी सांगितले की, कर्नाटकातील मराठी संस्थानांवर महाराष्ट्रातील सामाजिक बदलांचे फारसे पडसाद उमटले नाहीत. तसेच मराठी साहित्य इंग्रजीसह विविध भाषांमध्ये अनुवादित होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सुचवले. कर्नाटक मराठी साहित्य परिषदेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे राजकीय नेतृत्वाने यात लक्ष घालावे, अशी त्यांनी मागणी केली. सीमावर्ती भागांतील राजकीय परिस्थितीचा सामान्य मराठी माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी संस्कृतीच्या जपणुकीचे आव्हान

अर्चना मीरजकर यांनी बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचे जतन आणि मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या आव्हानाकडे लक्ष वेधले. प्रत्येकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी भाषिक अस्मिता टिकविण्याचे आवाहन केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत