मुंबई : म्हाडाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा १७,४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात २०२६-२०२७ या वर्षात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १३ हजार १२ घरांचे बांधकाम करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
म्हाडाने हे लक्ष्य साध्य करण्यासाठी १०,५८५.१२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, तर मुंबई मंडळांतर्गत विविध उत्पन्न गटातील २ हजार ५३८ घरे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी ६,७४७.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
म्हाडाचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता सुधारित व २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाकरिता १२,३९९.२२ कोटी रुपयांच्या सुधारित व २०२६-२७ च्या १७,४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
कोकण मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ५,११२ घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी १४९७.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ६६५ घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी अर्थसंकल्पात ६६४.०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील २,००८ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी १२०६.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील १ हजार ४८३ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी २५८.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिक मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील २३७ घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी १५१.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ९६९ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. अर्थसंकल्पात या बांधकाम खर्चासाठी ५९.९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे होणाऱ्या कामांसाठी २,७११ कोटींची तरतूद
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी /शासन निधीतून करण्यात येणाऱ्या कामांसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २,७११.९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभालीकरिता सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ६६१.७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.