महाराष्ट्र

...तर मी आत्महत्या केली असती; 'या' आमदाराच्या विधानाने खळबळ

एका पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये कार्यकर्त्यांसमोर २०१९मध्ये तुरुंगातून निवडणूक लढवून विजयी झालेल्या आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चा

प्रतिनिधी

"तुम्ही मला २०१९च्या निवडणुकीमध्ये निवडून दिले नसते, तर मी आत्महत्या करणार होतो," असे खळबळजनक वक्तव्य परभणीतील रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला. रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ची विधानसभा निवडणुक ही तुरुंगातून लढवली होती. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला होता. यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यावेळी त्यांची काय मनस्थिती होती, हे सांगितले.

या कार्यक्रमामध्ये रत्नाकर गुट्टे म्हणाले की, "तुम्ही माझा परिवार आहात. माझे जगणे आणि मरणे हे सर्वकाही या परिवारासाठी आहे. तुम्ही मला जीवनदान दिले आहे. मी जर त्यावेळेस निवडणूक हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. मी खोटे बोलत नाही आणि बोलणारही नाही, तुम्ही निवडून दिल्यामुळे मी आता जे काही जगतोय ते माझ्यासाठी बोनस आहे. त्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

कोण आहेत रत्नाकर गुट्टे?

रत्नाकर गुट्टे हे रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी २०१९मध्ये विधानसभा निवडणूक ही तुरुंगातून लढवली होती. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्या प्रकरणी गंगाखेड शुगरचे चेअरमन असणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन नाकारला असतानाही त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा तब्बल १८ हजार मतांनी पराभव केला होता.

घारापुरी बेटावर प्रगत जलव्यवस्थापनाचा उलगडा; पुरातत्त्व विभागाचे उत्खनन, जागतिक व्यापाराचे केंद्र असल्याचेही समोर

रत्नागिरी पॅसेंजर दादरहून नाहीच; पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतर दादरपासून गाडी चालविण्याचा विचार

राज्यात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचा निधी वितरीत

२५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल

Mumbai : मिठी नदी गाळ उपसा करण्यात विलंब; किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल