मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्यामुळे त्यांनी तातडीने माफी मागण्याची गरज असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. भाजपचा हा सत्तेचा माज असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली. अशा भ्याड हल्ल्याचा काँग्रेस निषेध करीत असून असल्या हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसकडून त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी भाजपवर टीका केली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला.