पनवेल : राजस्थानातील उदयपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून १४ प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. एसीच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
उदयपूरहून पुण्याकडे जाणारी बस सकाळी सुमारे ७.२५ वाजता रसायनीजवळ आली असताना बसच्या एसीच्या वायरिंगमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व १४ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र काही वेळातच आग संपूर्ण बसमध्ये पसरली. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान, बस रस्त्याच्या कडेला उभी असल्याने आणि सकाळची वेळ असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नाही.