महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेची तोडफोड; नेम प्लेट देखील काढून फेकली (Video)

Swapnil S

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाबाहेर एका महिलेने गोंधळ घालत तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. गुरूवारी संध्याकाळी ही घटना घडली असून अज्ञात महिलेचा व्हिडिओ शुक्रवारी इंटरनेटवर व्हायरल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास ही महिला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आली होती. त्यानंतर तिने गोंधळ घालत उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या दारावरील नावाची पाटी काढून फेकली. याशिवाय, महिलेने तेथे असलेल्या कुंड्यांचीही तोडफोड करत त्या फेकून दिल्या आणि नंतर तिथून निघून गेली.

महिलेला विनापास प्रवेश कसा मिळाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, ती महिला पर्स आतमध्ये राहिल्याचे सांगून सचिवालय गेटने गेटपास न घेता पुन्हा आतमध्ये शिरली होती असं सांगितलं जातंय. ही महिला कोण होती याबाबतची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. मरिनड्राईव्ह पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत.

या घटनेमुळे सुरक्षेतील त्रुटींवरुन विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे. तर, इतर लोक तासंतास रांगेत उभे असताना उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एखादी व्यक्ती अशाप्रकारे कशी पोहोचू शकते, असा सवाल काही नेटकरीही विचारत आहेत. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना, हा राजकीय मुद्दा नसून सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. गृहमंत्र्यांच्या जीवाला धोका असू शकतो, सर्व पैलूंचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

IND vs BAN: कानपूर स्टेडियममध्ये बांगलादेशी 'सुपरफॅन'वर हल्ला? प्रेक्षकांनी मारल्याचा केला आरोप, रुग्णालयात दाखल (Video)

अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी दफनभूमी मिळेना; कुटुंबियांची हायकोर्टात धाव; अंबरनाथमध्ये अंत्यसंस्कार होण्याची शक्यता

‘रेड अलर्ट’नंतर पाऊसच गायब! आज पुन्हा मुसळधारचा इशारा; मुंबईत 'ऑरेंज', तर 'या' जिल्ह्यांना 'रेड' व 'येलो' अलर्ट जारी

Pune Metro : पावसामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द झाल्याने स्वारगेटपर्यंत मेट्रो पोहोचण्याच्या मार्गालाही 'ब्रेक'!

पाण्याची चिंता मिटली! दमदार पावसामुळे राज्यातील धरणे भरली; बघा कोणत्या धरणात किती पाणीसाठा?