महाराष्ट्र

... तरच निवडणुका घ्या! मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याची मविआच्या शिष्टमंडळाची मागणी

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारनंतर पुन्हा एकदा बुधवारीही राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली.

Swapnil S

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारनंतर पुन्हा एकदा बुधवारीही राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली. या बैठकीत ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी आयोगाकडे केली. तर मतदार याद्यांमधील घोळावरून शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले होते.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी दिनेश वाघमारे यांची महाविकास आघाडीसह मनसे नेत्यांनी सलग दुसऱ्या दिवशी भेट घेऊन मतदार याद्यांतील विसंगतीबाबत निवेदन देत निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील, शशिकांत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, अजित नवले यांच्यासह अनेक विरोधी नेते यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दोन्ही प्रतिनिधींची सलग दोन दिवस भेट घेतली. चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. उलट मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करून ठेवला आहे. काही ठिकाणी मुलाचे वय वडिलांपेक्षा जास्त दाखवल्याचे सांगत कोण कोणाचे वडील आहेत, असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला टोला लगावला.

मतदार यादी गोपनीय कशी असू शकते - राज ठाकरे

“निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांना आणि मतदान करणाऱ्या मतदारांना याद्या द्यायला आयोग नकारघंटा दाखवते. मुळात मतदान गोपनीय असते, पण मतदार यादी गोपनीय कशी असू शकते?” असा थेट सवाल राज यांनी करत आयोगावर हल्लाबोल चढवला.

“राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींनी त्यात सुधारणा करायला हवी. ते सुधारल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे समाधान व्हायला हवे. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवले असून मतदार याद्यांमधील हा घोळ आधी दुरुस्त करावा त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली. दरम्यान, २०१४ पूर्वी निवडणुका व्यवस्थित होत होत्या. परंतु, आता मतदार याद्यांसाठी प्रत्येक पानाला दोन रुपये आकारले जातात. याच्यातही कमाईचा उद्योग सुरू आहे,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, २०१७ मध्ये अजित पवार आमच्यासोबत होते, आजही त्यांनी यायला पाहिजे होते. तेव्हा ते तावातावाने बोलतपण होते, असा मिश्किल टोला राज यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरी युतीच्या नेत्यांचा आणि निवडून आलेल्या आमदारांचा जल्लोष नव्हता. निवडून आलेल्या लोकांनाच धक्का बसावा, ही कोणती निवडणूक आहे? असा सवाल राज यांनी केला.

“लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. गेल्या विधानसभेपासून हा विषय सर्वांच्या लक्षात आला आहे. निवडणूक अधिकारी देखील आता सत्ताधाऱ्यांच्या कठपुतळी बाहुल्या बनल्या आहेत. कोणीतरी त्यांना आदेश देऊन काम करवून घेत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला विविध मुद्द्यांवर योग्य उत्तरे मिळाली नाहीत. लोकशाहीच्या नावाने जर हुकुमशाही गाजवणार असाल तर सहन करणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

जयंत पाटील यांनी मतदार याद्यांतील त्रुटींची ठोस उदाहरणे सादर केली. मुरबाडमध्ये ४०० मतदारांच्या घरासमोर डॅश आहे, बडनेरात आणि कामठीत घर क्रमांक शुन्य तर नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ता यांचे नाव सहा वेळा नोंदवले आहे. सर्व पुरावे आयोगासमोर मांडल्यानंतर दुपारी नाव होते, परंतु, सायंकाळी ते गायब झाले. याचा अर्थ कुणीतरी बाहेरची व्यक्ती निवडणूक आयोगाचे सर्व्हर चालवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

निवडणूक काळात एरवी दर तासाला जाहीर होणारे मतदान दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाहीर केले. संपूर्ण यंत्रणेचा बट्ट्याबोळ करत मतांची टक्केवारी अचानक वाढवली. परंतु, हे मतदान कोणी, कुठे, किती मतदान केले अद्याप स्पष्ट झाले नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. दरम्यान, शिवसेना आमदार विलास भूमरे यांनी २० हजार मतदार बाहेरून आणल्याने विजय झाल्याचा दावा केला. याची नोंद घेऊन सखोल चौकशी करून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली.

राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्याच्या मोबाईलवर ओटीपी आला. तो कसा? याबाबत आम्ही तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचे काम करणारा देवांग दवे हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला कंत्राट कसे मिळाले होते, याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप खुलासा केलेला नाही, असा आरोप विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करतेय - जयंत पाटील

महाराष्ट्रात एकेका मतदाराला ८-८ वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे. इपिक नंबर एकच असतो, अशी आजपर्यंत आपली खात्री होती. पण मतदारयाद्यांत अनेक इपिक नंबरचे मतदार असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस श. प. गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

चुकीच्या याद्यांसह निवडणूक होणे हे लोकशाहीसाठी घातक - थोरात

आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण त्याने आमचे कोणतेही समाधान झाले नाही. आगामी निवडणुका चुकीच्या मतदार याद्यांसह होणार असतील, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. काही आमदार सांगतात की, आम्ही बाहेरून २० हजार मते आणली. काहींची नावे वगळली गेली, तर काहींची तीच तीच नावे दिसून येत आहेत. वसतिगृहात राहणारे परराज्यातील विद्यार्थीही महाराष्ट्राचे मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेल्या मतदार यादीवर राज्याची विधानसभा निवडणूक झाली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव