नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी खळबळ उडवून दिली. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पैशांच्या मोठमोठ्या बंडलासह दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओतील पैशांसह दिसणारी व्यक्ती हा आमदार असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी या व्हिडीओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे आमदार कोण आहेत, असा सवाल केला आहे.
“या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?,” असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. या व्हिडीओमुळे आता अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची आयती संधी विरोधी पक्षांना मिळाली आहे.
यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा आपल्याच घरातील खोलीत पैशांच्या बॅगांसह एक व्हिडीओ समोर आला होता. आता दानवे यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या व्हिडीओमधील व्यक्ती ही शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी असल्याचे बोलले जाते.
अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमांवर व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. हे आमदार पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. दानवे यांनी समाजमाध्यमांवर तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यात पैशांच्या बंडलांसह एक लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे, तर एका व्हिडीओत शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचे दिसत आहे. या पोस्टमुळे अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे चर्चेत आले आहेत.
रायगड जिल्ह्यात तीव्र पडसाद
दानवे यांच्या व्हिडीओ बॉम्बचे रायगड जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. अलिबाग, मुरूड आणि रोहा येथे शिवसैनिकांनी निदर्शने केली. रस्त्यावर उतरत शिवसैनिकांनी अंबादास दानवे यांचा पुतळा जाळला. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या विजयानंतरचा आमदार दळवी यांचा व्हिडीओ वापरून हा बनावट व्हिडीओ दानवे यांनी तयार केल्याचा दावा यावेळी दळवी समर्थकांनी केला. या व्हिडीओमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महेंद्र दळवी यांनी आरोप फेटाळले
या व्हिडीओनंतर आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांच्यावर घणाघात केला. “मला बदनाम करण्याची सुपारी अंबादास दानवे यांना कुणी दिली, हे त्यांनी सांगावे. हा व्हिडीओ माझा नाही. दानवे यांनी खरे दाखवावे. ते सुपारीबाज नेते आहेत. जर पैशाचे आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. पैशांची बंडलं घेणारी ती व्यक्ती कोण आहे, हे लोकांसमोर आले पाहिजे. संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. दानवे यांनी अधिकृतपणे पटलावर माहिती ठेवावी. अंबादास दानवे ब्लॅकमेलिंग करण्याचे काम करतात. सभागृहात कोण प्रश्न विचारतील, त्यांना उत्तर देण्याची माझी नक्की तयारी आहे. व्हिडीओ कॉलमधील तो व्यक्ती कोण आणि त्याच्याशी काय संवाद झाला, हे दानवेंनी सांगावे,” असे सांगत आमदार महेंद्र दळवी यांनी हे आरोप फेटाळले.