Nagpur : शाळकरी विद्यार्थ्यांचं कृत्य; यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Nagpur : शाळकरी विद्यार्थ्यांचं कृत्य; यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

नागपुरात १८ वर्षीय तरुणाने यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून १६ वर्षीय मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला आहे...

Mayuri Gawade

नागपूर : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अनेकजण नवनवीन गोष्टी शिकतात. मात्र, नागपुरात एका शाळकरी तरुणाने यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून आपल्या अल्पवयीन मैत्रिणीचा घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गर्भवती असल्याचं समजल्यानंतर डॉक्टरांची मदत घेण्याऐवजी त्याने इंटरनेटवर गर्भपाताचे उपाय शोधले. त्यानंतर १६ वर्षीय मुलीला औषधी वनस्पतींची मिश्रणं आणि गर्भपाताची औषधं दिल्याचा आरोप आहे. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि मुलीने घरीच बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्यावर गुरूवारी (दि. १५) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

शाळेतच झाली होती दोघांची ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी तरुण उत्तर नागपुरातील एकाच शाळेत शिकत होते. गेल्या वर्षी दोघांमध्ये जवळीक वाढली होती. आरोपीच्या घरी कुटुंबातील इतर सदस्य नसताना त्यांच्यात शारीरिक संबंध आल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यानंतरही आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसंच, तिला लग्नाचं आश्वासनही दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

गर्भधारणा समजताच यूट्यूबवर शोधले उपाय

काही काळानंतर मुलीला आपण गर्भवती असल्याचं समजलं. तिने ही बाब आरोपीला सांगितली. मात्र, तिला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने यूट्यूबवर गर्भपातासंबंधी व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. या व्हिडीओंच्या आधारे त्याने काही औषधी वनस्पतींची मिश्रणं तयार करून मुलीला दिल्याचा आरोप आहे. अनेक आठवडे तिला गर्भपाताची औषधंही देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रयत्नांमुळे गर्भपात झाला नाही.

घरीच प्रसूती, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

सोमवारी मुलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने घरीच बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला तातडीने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं.

नवजात बाळाला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मुलीला प्रसूतीनंतर गंभीर त्रास होत असल्याचं लक्षात येताच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा

पाचपावली पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून गुरुवारी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

पाचपावली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नुकताच १८ वर्षांचा झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, कथित शारीरिक संबंधांच्या वेळी तो स्वतःही अल्पवयीन होता. त्यामुळे घटनेच्या वेळी त्याचं नेमकं वय किती होतं, याची तपासणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे.

पीडित मुलीला समुपदेशन आणि मानसिक आधार मिळावा, यासाठीही पोलिस प्रयत्न करणार आहेत. हे प्रकरण बालकल्याण समितीकडे पाठवण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसाअभावी शेतकरी हवालदिल, खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्य

तीन मुलांसह एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय