नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट)
महाराष्ट्र

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल

दगडफेकीनंतर दुरंतो एक्स्प्रेस पुढील स्थानकावर थांबल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले आणि त्यांनी...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसवर शुक्रवारी (दि. २५) रात्री बोरखेडी-सिंधी रेल्वे मार्गावर दगडफेक करण्यात आली. रात्री सुमारे ८.३० वाजता घडलेल्या या घटनेत ए-१, बी-२ आणि बी-५ या तीन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे प्रशासनाकडे नसली, तरी एका प्रवाशाने सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार त्याचे चार मित्र जखमी झाले आहेत.

ट्रेन क्रमांक १२२९० नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस बोरखेडी स्थानक ओलांडल्यानंतर काही वेळातच धावत्या ट्रेनवर बाहेरून दगडासारखी वस्तू फेकण्यात आली. ही वस्तू खिडकीवर आदळल्याने काच फुटून तिचे तुकडे डब्यातील प्रवाशांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर उडाले. काही काचेचे तुकडे प्रवाशांच्या खाद्यपदार्थांमध्येही पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अचानक खिडकीची काच फुटली अन्...

दगडफेकीची ही घटना एका प्रवाशाच्या मोबाइलमध्ये कैद झाली आहे. एसी कोचमध्ये काही प्रवासी शेजारी बसलेले असताना अचानक दगड खिडकीच्या काचेवर आदळतो आणि काच फुटून दगड कोचमध्ये येतो. यावेळी काही प्रवासी काॅलवर बोलत होते, तर एक प्रवासी जेवणाचा डबा उघडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

दगड खाली पडला असला तरी फुटलेल्या काचेचे तुकडे प्रवाशांच्या अंगावर उडाले. दगड खिडकीऐवजी प्रवाशांना लागला असता परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, अशी प्रतिक्रिया संबंधित प्रवाशाने व्यक्त केली आहे. एसी कोचमध्ये दोन्ही बाजूंना लहान मुलांसह कुटुंबे प्रवास करत होती, असेही त्याने सांगितले.

प्रवाशांनी पोलिसांना दिली माहिती

दगडफेकीनंतर दुरंतो एक्स्प्रेस पुढील स्थानकावर थांबल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्रवासी पुन्हा डब्यात परतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना संबंधित प्रवाशाने 'भारतीय रेल्वे, आम्ही सुरक्षित आहोत का?' असा सवाल उपस्थित केला.

या घटनेनंतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे मार्गावरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची आणि दगडफेकीसाठी जबाबदार व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आरपीएफ, जीआरपीकडून शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) संबंधित रेल्वे मार्गावर शोधमोहीम सुरू केली. बोरखेडी तसेच ब्राह्मणी गावाच्या परिसरातही पथकांकडून तपासणी करण्यात आली. संशयित व्यक्तींबाबत माहिती मिळवण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पोलिस पाटील यांचीही चौकशी करण्यात आली.

मात्र, शोधमोहिमेदरम्यान कोणत्याही संशयिताची ओळख पटली नाही. घटनास्थळावरूनही तपासाला मदत होईल असा ठोस पुरावा मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल

दुरंतो एक्स्प्रेसवर नेमक्या कोणत्या ठिकाणाहून दगड फेकण्यात आला आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दगडफेकीमुळे दुरंतो एक्स्प्रेसच्या तीन डब्यांच्या खिडक्यांच्या काचांचे नुकसान झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या घटनेसाठी जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

Noida Bus Fire : 'ती उतरल्यावरच मी उतरेन'; जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईसोबत थांबला, मायलेकांचा करुण अंत

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO