नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा आणि लेंडी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने बचावकार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सीआरपीएफ, महापालिका तसेच स्थानिक यंत्रणांच्या पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सैन्यदलाची बटालियनही नांदेडमध्ये दाखल झाली आहे.
जिल्ह्यातील ९३ पैकी ६९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून कंधार व माळाकोळी मंडळांत प्रत्येकी २८४.५० मिमी इतका सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. १३ पैकी ११ तालुक्यांत शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
या अतिवृष्टीमुळे नायगाव येथे एक, उमरीत रेल्वे स्थानक अधीक्षक तर किनवट तालुक्यात विजेचा धक्का लागून एक असा मिळून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. जिल्ह्यात तीन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
नांदेडमध्ये वीजपुरवठा खंडित
नांदेड : नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. ढगफुटीसुदृश पावसामुळे परिमंडळातील वीज व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कंधार, नायगाव, नांदेड ग्रामीणमधील उच्चदाब वाहिन्यावरील विजेचे खांब वाहून गेल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला. बहुतांश उपकेंद्राच्या यार्डात पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला. सुरक्षेचा भाग म्हणून नांदेड जिल्ह्यासह परिमंडळातील सुमारे २० ते २२ विद्युत उपकेंद्रातून वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करावा लागला. ७७ लघु व उच्च दाब वाहिन्यावरील पुरवठा बंद राहीला. पर्यायाने ८४ गावे बाधित झाली आहेत. दरम्यान, सरकारी दवाखाने, पाणीपुरवठा वीज योजना, सरकारी कार्यालय, पोलीस ठाणे, शाळा-महाविद्यालय, धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांचा विद्युत पुरवठा प्राधान्यक्रमाने पूर्ववत करण्याच्या सूचना मुख्य अभियंता राजाराम माने यांनी दिलेल्या आहेत. कंधार, नायगाव, देगलूर परिसरातील लेंढी नदी पात्र, रेडगाव जवळा, बंधन, मांजरम गोदाम येथील विजेचे खांब पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्युत रोहित्र पाण्यात गेल्याने तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावा लागला होता, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. बचाव व मदतकार्य सुरळीत सुरू असून पूरस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. - राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी
धरणांमधून विसर्ग सुरू
विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात येऊन एक लाख १९ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक पाणी सोडण्यात येत आहे. उर्ध्व पेनगंगा धरणातून ८,३१३ क्युसेक्स, येलदरी धरणातून ६,९२० क्युसेक्स, सिद्धेश्वर धरणातून १२,१४१ क्युसेक्स, तर बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून ५,०९७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.