Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी X
महाराष्ट्र

Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी

नंदुरबारच्या शहादा येथील शासकीय वसतिगृहात जेवणानंतर सुमारे ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. २५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्न आणि उलट्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Mayuri Gawade

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात शनिवारी (दि. ११) अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. रात्री जेवण केल्यानंतर सुमारे ४० विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. यापैकी २५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली आहे. दरम्यान, विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे तसेच उलट्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

जेवणानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

शनिवारी रात्री वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, सुमारे ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा आणि गॅस्ट्रायटिसचा त्रास झाला असून, त्यापैकी २५ विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील २० जण शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ऑक्सिजन आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवलेल्या पाच विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, उपचार सुरू असून बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ग्रामीण रुग्णालयातील विद्यार्थ्यांना २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

अन्न आणि उलट्यांचे नमुने तपासणीसाठी

घटनेनंतर प्रशासनाने जेवणाचे नमुने तसेच विद्यार्थ्यांच्या उलट्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, तपास अहवाल आल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. तसेच मुख्याध्यापक, समाजकल्याण अधिकारी आणि वॉर्डन यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. पालकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी पोलिस आणि प्रशासन समन्वयाने काम करत असून, वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी पुढील दोन महिन्यांत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

विद्यार्थ्यांनी याआधीही केली होती तक्रार

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी याआधीही निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याबाबत अनेकदा तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटीही केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री जेवण सुरू केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पहिला घास घेताच त्यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. काही विद्यार्थी जागीच कोसळले, तर त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनाही तोच त्रास जाणवू लागला. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी ते जेवण केले नव्हते, त्यांना कोणताही त्रास झाला नाही, असेही उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, प्रांताधिकारी दीपक गिरासे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय पथक रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार

Mumbai : सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतोच असे गृहित धरता येणार नाही; अपघात भरपाई प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस महेंद्रगिरी' दाखल; सागरी सुरक्षा अधिक भक्कम - ‘माझगाव डॉक’ने बनवली अत्याधुनिक युद्धनौका

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

मुंबईत बाल-माता मृत्युदरात घट; BMC च्या आरोग्य जागरूकतेचा परिणाम