Nashik : दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण; निफाड तालुक्यात भोंदू महाराजावर गुन्हा 
महाराष्ट्र

Nashik : दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण; निफाड तालुक्यात भोंदू महाराजावर गुन्हा

घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत एका भोंदू महाराजाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यात उघडकीस आली आहे.

Swapnil S

लासलगाव : घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत एका भोंदू महाराजाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (३१) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला (२८) हिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, तिचे दोन विवाह अपयशी ठरल्याने आणि मुलगी तिच्यासोबत नसल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या पार्श्वभूमीवर तिच्या आई-वडिलांनी तिला लासलगावजवळील धारणगाव (खडक) येथील तथाकथित ‘प्रतिगाणगापूर मठा’त नेले. तेथे महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी काढण्याचे काम करीत असल्याचा आभास निर्माण करत होता.

१५ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला आई-वडिलांसह मठात गेली असता, आरोपीने तिच्या अंगात ‘करणीबाधा’ असल्याचे सांगून विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेऊन सतत वैयक्तिक व अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. ‘तू मला आवडतेस’, ‘लग्न करू नकोस, माझा मठ चालव’ अशा प्रकारचे संदेश त्याने पाठवले होते.२३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपीने पंचवटी परिसरात भेटीस बोलावून तिला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे “माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू विरोध करू शकणार नाहीस,” अशी भीती दाखवून तिच्यावर बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या घटनेनंतर पीडित महिला मानसिक धक्क्यात होती. कुटुंबीयांची भीती आणि आरोपीच्या प्रभावामुळे तिने तक्रार देणे टाळले. पुढे पीडितेचे लग्न झाले; मात्र आरोपीचे प्रभावशाली लोकांशी संबंध असल्याच्या भीतीमुळे तिने गप्प राहणे पसंत केले.

दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्यानंतर तिने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पीडित महिला व तिच्या पतीने लासलगाव पोलीस ठाणे गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी घटनेची पडताळणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण