नाशिक : नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणारी मोठी घडामोड घडली आहे. मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईन उभारणीसाठी केंद्र रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे नाशिक–मुंबई लोकल सेवेसह अनेक नवीन गाड्यांसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्लॉट समस्येचे समाधान होणार आहे. नाशिक–मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत तसेच नवीन एक्सप्रेस किंवा पॅसेंजर गाड्यांची वाढ करण्याबाबत प्रयत्न सुरू असताना रेल्वे प्रशासनाकडून “स्लॉट उपलब्ध नाहीत” हा प्रमुख मुद्दा सतत पुढे येत होता.
मुंबई विभागाकडे येणाऱ्या विद्यमान ट्रॅकवर प्रचंड गर्दी असून, वेगवेगळ्या गाड्यांचे तासन्तास कोंडीत अडकणे, अप-डाऊनची मर्यादित क्षमता, मालगाड्यांची वाढती संख्या आणि सिग्नलिंगवरील दडपण यामुळे नवीन सेवांची अंमलबजावणी अशक्य होत होती. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र व रेल्वे मंत्रालयाकडे मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या दोन महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्वतंत्र दोन-दोन नवीन रेल्वे लाईन उभारण्याची ठोस व सातत्यपूर्ण मागणी केली. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून रेल्वे मंत्रालयाने आता दोन्ही मार्गांवर नवीन दुहेरी रेल्वे लाईन उभारण्यास मान्यता दिली आहे.
नवीन लाईन मंजूर झाल्याने नाशिक–मुंबई लोकल प्रकल्पाला वास्तविक गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षे तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला हा जनजीवनाशी थेट संबंधित प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे.
प्रकल्पाचे फायदे
गाड्यांची संख्या वाढविणे सोपे होईल
लोकल सेवेसाठी आवश्यक स्लॉट उपलब्ध होतील
मालगाड्यांची हालचाल स्वतंत्र ट्रॅकवर वळवता येईल
मुंबई–नाशिक–मनमाड रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान व वेळेवर होईल
नाशिक–मुंबई लोकल सेवेला नवा मार्ग मोकळा
प्रथमतः सरकारचे मनःपूर्वक आभार. तसेच, नवीन लाईनच्या मंजुरीनंतर आता प्रकल्प अंमलबजावणी वेगाने व्हावी यासाठी माझा आक्रमक पाठपुरावा राहील. महत्वाचे म्हणजे यासाठी होणाऱ्या भूमिअधिग्रहन प्रक्रियेत स्थानिक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठीही मी कटिबद्ध आहे.राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक