नाशिक : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका डॉक्टर दांपत्याच्या दोन अल्पवयीन मुलींचा राहत्या घरच्या पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
ही घटना शनिवारी शहरातील पंचवटी परिसरातील शुभम कॉलनी येथे घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
घटनेच्या वेळी दोन्ही मुले घरीच होती, तर त्यांचे डॉक्टर आई-वडील त्यांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. घरी परतल्यानंतर आईने मुलींचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्या घरामागील पाण्याच्या टाकीत आढळून आल्या. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने वृत्ती आणि आणि स्वस्ती या दोन्ही मुलींना टाकीतून बाहेर काढले आणि बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये या दोन बहिणींच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.