नाशिक टीसीएस प्रकरण: निदा खानच मुख्य सूत्रधार; २० दिवसांपासून फरार, सात जणांना अटक, तपासात धक्कादायक माहिती  
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरण: निदा खानच मुख्य सूत्रधार; २० दिवसांपासून फरार, सात जणांना अटक, तपासात धक्कादायक माहिती

नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

Swapnil S

नाशिक : नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा खान गेल्या २० दिवसांपासून फरार असून तिचा शोध अद्याप लागलेला नाही.

निदाच्या अटकेसाठी तीन स्वतंत्र पथके

पोलिसांनी निदा खानच्या अटकेसाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. तरीही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहणारी निदा खानच या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचे समोर आले आहे.

हिंदू तरुणींवर धर्मांतरासाठी मानसिक दबाव

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कंपनीतील कामाच्या मीटिंगच्या माध्यमातून काही महिलांना लक्ष्य केले जात होते. विशेषतः हिंदू तरुणींना वेगळे करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात होता. त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात होते. विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक तसेच लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व कारवायांमध्ये निदा खान सक्रियपणे भूमिका बजावत असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिच्या चौकशीतूनही अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. तिच्या जबाबातून निदा खानच या संपूर्ण प्रकारामागील प्रमुख व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा पुरुष आणि दोन महिला आरोपींचा समावेश असलेल्या या प्रकरणात एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून कारवाया राबवल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठे आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तर निदा खान २०२१ पासून व वयाच्या २६ व्या वर्षा पासून कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत होती. नव्याने नोकरीला लागलेल्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तीच शिफारस करत असे आणि त्यातूनच त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. आर्थिक व्यवहारांमध्येही तिचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी निदा खानची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या अटकेनंतर या रॅकेटमागील खरे सूत्रधार आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी तिचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांनंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली असून निदा खान हिचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या गुन्ह्यात संशयितांना काही कट्टरपंथीय संस्था मदत करत होत्या का? आणि फॉरेन कंपन्यांनी अर्थसाहाय्य केले का? याचा तपास केला जाईल. मात्र, अद्याप याबाबत काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

राज्यात आणखी ८ स्वयंचलित वाहन चाचणी मार्ग; RTOमध्ये व्हिडीओ आधारित मूल्यांकन यंत्रणा

‘नारीशक्ती’ पणाला! ‘आरक्षण’, ‘सीमांकन’ विधेयके संसदेत सादर; आज मतदान, दक्षिणेवर अन्याय नाही- शहा, द्रमुक न्यायालयात जाणार

Lebanon-Israel Ceasefire : लेबनॉन आणि इस्रायल यांचा युद्धविराम