महाराष्ट्र

नाशिकमध्ये अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान; जिल्ह्यात २,८७७ हेक्टर पीक नष्ट

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ६ हजार ५७० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल नाशिकच्या कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यामध्ये २,८७७ हेक्टरवरील कांदा पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.

Swapnil S

लासलगाव : अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ६ हजार ५७० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल नाशिकच्या कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यामध्ये २,८७७ हेक्टरवरील कांदा पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.

६ मे पासून अवकाळीने जिल्ह्यातील १५ तालुक्यांना झोडपून काढले. मे महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे १ हजार गावे बाधित झाली असून, सुमारे १९ हजार ९०७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळीने शेती पिकांबरोबरच फळ पिकांना नष्ट केले. काढणीला आलेला कांदा अन् साठवणूक केलेल्या कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६,५७० हेक्टर क्षेत्राला अवकाळीने बाधित केले. वादळीवारे, अतिवृष्टी, अवेळी पावसाने शेतीपिकांचे आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी त्वरित दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंधरा तालुक्यांतील नष्ट झालेल्या शेतीपिकांचा प्राथमिक अहवाल तयार करून कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना सादर केला आहे.

२ हजार हेक्टरवरील कांदा नष्ट

नाशिक जिल्हा कांदा लागवडीसाठी ओळखला जातो. दरवर्षी सुमारे ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा पीक लावले जाते. मात्र, अवकाळीने यंदा २,८८७ हेक्टरवरील कांदा पिके नष्ट झाली आहेत.

गेल्या महिन्यात सतत झालेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे..

शासनाकडून नुकसानीचे दर निश्चित

शासनाने कोरडवाहू क्षेत्रासाठी १३,६०० रुपये, बागायत क्षेत्रासाठी २७ हजार रुपये, फळपिकांसाठी ३६ हजार प्रति हेक्टर नुकसानीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार एकूण ६ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

तीन हजार हेक्टरवरील बागायती पिके नष्ट

जिल्ह्यात बागायती पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. नाशिक जिल्ह्याचे वातावरण फळपिकांना पोषक असल्याने फळपिकांची शेतीही येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र मेमध्ये अवकाळीने शेतकऱ्याला अस्मान दाखविले. जिल्ह्यातील १ हजार गावांतील सुमारे २० हजार शेतकऱ्यांची बागायती पिके नष्ट झाली. एप्रिलमध्ये बागायतीचे १,८७० हेक्टर तर मे महिन्यात ३ हजार ८८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

भाजीपाला महाग होण्याची शक्यता

जिल्ह्यात बळीराजाकडून भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. मुख्य बागायती पिकांसोबत भाजीपाल्याची लागवड केली जाते, मात्र अवकाळीने बागायती पिकांसोबत ७५० हेक्टरवरील भाजीपाला नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे भाजीपाला महागण्याची चिन्हे आहेत.

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली

नेपाळमध्ये आगडोंब! संसद, राष्ट्रपती भवन आणि मंत्र्यांची घरे जाळली

'सोन्याचा भडका'; १० ग्रॅम सोने १.१२ लाखांवर, दिवसभरात दरात ५,०८० रुपयांनी वाढ

सियाचीनमध्ये हिमस्खलनात लष्करातील ३ जवान शहीद; अनेक जण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

राष्ट्रपती, राज्यपाल केवळ नामधारी प्रमुख; कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडले मत, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक!