महाराष्ट्र

शरद पवार गटाला मिळाले नवे नाव; 'या' नावावर निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

Rakesh Mali

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल(६ फेब्रुवारी) अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्य दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आज(७ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षासाठी तीन नवीन चिन्ह आणि नावांचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते. त्यानंतर शरद पवार गटाला कोणते नाव आणि चिन्ह मिळणार याची उत्सूकता राजकीय वर्तुळात लागून होती. शरद पवार गटाकडूनही तीन नावांचे पर्याय आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील एका नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. हे नाव येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंतच वैध असेल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या नावाने ओळखला जाणार शरद पवार गट-

शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार आणि नॅशॅलिस्ट काँग्रेस पार्टी–एस, असे तीन पर्याय आयोगाला सुचवण्यात आले होते. या तीन पर्यायांपैकी दुसरा पर्याय आयोगाने मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत शरद पवार गट 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार' म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' या नावाने ओळखला जाणार आहे.

'वटवृक्ष' चिन्हासाठी आग्रही

येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे. तसेच, शरद पवार गट हा 'वटवृक्ष' या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णयही लवकरच लागण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमप्रतिनिधींशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

कुठल्या निकषांच्या आधारावर निर्णय घेतला-

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या निकषांचे उल्लंघन करून हा निकाल दिल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच, जर दोन्ही गटांच्या नेत्यांचा नियुक्ती अवैध ठरते, तर मग आयोगाने कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त