Pune : वारकऱ्यांसंदर्भातील विधान; विकास लवांडे यांना अटक (Photo-X/@VikasLawande1)
महाराष्ट्र

Pune : वारकऱ्यांसंदर्भातील विधान; विकास लवांडे यांना अटक

वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांना गुरुवारी वाघोली पोलिसांनी अटक केली.

Swapnil S

पुणे : वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांना गुरुवारी वाघोली पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या नलिनीताई वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र, ही संपूर्ण कारवाई म्हणजे आपली मुस्कटदाबी करण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा शासन पुरस्कृत प्रकार असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला.

लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर शिरले आहेत, असे विधान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आणि समाजात धार्मिक द्वेष निर्माण केल्याचा आरोप नलिनीताई वायाळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये केला होता. या प्रकरणात लवांडे यांनी मिळवलेला अंतरिम जामीन न्यायालयाने २० मे २०२६ रोजी रद्द केला आणि पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली.

‘चोर सोडून संन्याशाला फाशी’...

लवांडे यांच्यावर ९ तारखेला हभप संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला होता. लवांडे यांच्या म्हणण्यानुसार, त्या हल्ल्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ८ तारखेलाच भाजप कार्यकर्त्या नलिनी वायाळ यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्या आरोपींनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यांना मोकाट सोडून पोलिसांनी आपल्यालाच ताब्यात घेतल्याने लवांडे यांनी ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा टोला सरकारला लगावला आहे.

जिवाला धोका असल्याची तक्रार

लवांडे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचेही यावेळी नमूद केले. त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ती केवळ शाई नव्हती तर ते एक घातक रसायन होते, ज्याचा त्रास त्यांना दोन दिवस झाला. तसेच त्यावेळी त्यांच्यावर रिव्हॉल्वरही रोखण्यात आले होते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी पोलीस महासंचालकांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. उलट, सोशल मीडिया आणि फोनवरून त्यांना दररोज जिवे मारण्याच्या धमक्या येत असून संभाजी भिडे यांचे धारकरी, बजरंग दल आणि भाजपच्या लोकांपासून आपल्याला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारवर राष्ट्रवादीची टीका

या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत राज्याचे गृहखाते नेमके कोणत्या दिशेने काम करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील जनता दहशतीच्या छायेखाली असताना गृह मंत्रालय सुस्त आहे आणि राजकीय कार्यकर्त्यांना सुडबुद्धीने अटक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आमदार रोहित पवार यांनीही या कारवाईचा तीव्र निषेध केला असून, ज्यांनी लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला ते मोकाट आहेत, पण घुसखोरांचा चेहरा समोर आणणाऱ्या लवांडेंना अटक केली जाते, हा ‘चोराला बेल आणि तक्रारदाराला जेल’, असा प्रकार आहे, अशी टीका केली.

कितीही दिवस जेलमध्ये बसायला तयार

विकास लवांडे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, त्यांनी कोणतेही असंसदीय विधान केलेले नाही किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही. तरीही केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई केली जात आहे. नितेश राणे आणि काही आमदारांनी संग्राम भंडारे याला तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच हे सर्व शासन पुरस्कृत दडपशाहीचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. या दडपशाहीविरोधात आपण जामीन घेणार नाही किंवा वकीलही लावणार नाही, तर कितीही दिवस जेलमध्ये बसायला तयार आहोत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

खत तुटवड्याचे मोठे संकट; खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियात धुमाकूळ

NEET Paper Leak : लातूरचे डॉ. शिरूरे यांना अटक; नीट पेपरफुटी तपासाचा मोहरा आता डॉक्टरांकडे

ठाण्यात मार्केटला आग; दोघांचा मृत्यू, तीन अग्निशमन जवान जखमी

भाषणांचा अमृतकाळ, जनतेसाठी संकटकाळ