महाराष्ट्र

आव्हाड म्हणजे राष्ट्रवादीतील खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ - आनंद परांजपे

Swapnil S

ठाणे : “२०१४, २०१६, २०१९, २०२२ या साली काय घडले? हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना विचारायची हिंमत दाखवावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविली. तरी हे सातत्याने आमच्या नेत्यांबद्दल बोलत असतात, पण राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे,” असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई येथे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आणि कळवा येथील शिमग्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले. पण २०१४ साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला? २०१६ साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काही बैठका झाल्या, या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही? २०१९ मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कुणाच्या आशीर्वादाने झाला?, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला.

कौटुंबिक नातेसंबंधांवर आव्हाडांनी बोलू नये

अजितदादा व सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या घरातील संबंधांवर भावाबहिणीच्या संबंधांवर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांनादेखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की, तुमचे तुमच्या बहिणीशी संबंध कसे आहेत? हे त्यांनी स्वत:देखील तपासून घ्यावे. बायकोचे आणि नवऱ्याचे नातेदेखील जवळचे आहे. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर आव्हाड यांनी बोलू नये, असेही आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार