संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

फिर एक बार महायुती सरकार! पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

काँग्रेसला केवळ सत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांनी तुष्टीकरणाचा खेळ खेळला आणि तीच काँग्रेस दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करेल. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यामध्ये व्यक्त केले व ‘फिर एक बार महायुती सरकार’ची घोषणा दिली.

Swapnil S

पुणे : काँग्रेसला केवळ सत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांनी तुष्टीकरणाचा खेळ खेळला आणि तीच काँग्रेस दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करेल. त्यामुळे जनतेने सावध राहावे, ‘हम एक रहेंगे, तो सेफ रहेंगे’, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यामध्ये व्यक्त केले व ‘फिर एक बार महायुती सरकार’ची घोषणा दिली.

‘पुण्यातील लाडक्या बहीण आणि भाऊ यांना माझा प्रणाम’ अशी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, मी महाराष्ट्राच्या विविध भागात फिरलो असून जनतेचे अभूतपूर्व समर्थन मला मिळत आहे. विमानतळ ते सभास्थळ अनेक लोक गर्दी करून अभिवादन करत होते. महाराष्ट्रामध्ये ‘फिर एक बार महायुती सरकार’ सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

परदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. वीर सावरकर यांना सतत ते शिव्या देतात. राहुल गांधी यांच्या तोंडून महाविकास आघाडीने वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले. ही निवडणूक देशाला विकासाच्या वाटेवर नेणारी आहे. देशविरोधी ताकदीला धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील दहा अशा एकूण ३१ विधानसभा मतदासंघांतील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह ३१ मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते.

मोदी म्हणाले, काँग्रेसच्या कटकरस्थानाचा भाग कर्नाटकमध्ये दिसून येत आहे. तिथे सरकार बनले, पण काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. केवळ घोटाळे समोर येत आहेत. या लुटीचा पैसा महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढवली जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभेत ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महाराष्ट्रात कोरे संविधान पुस्तके ते वाटप करतात. सात दशक संविधान काश्मीरमध्ये लागू का नव्हते याबाबत त्यांनी भूमिका मांडावी. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान प्रथमच लागू झाले आहे. कारण जनतेने मोदीला सेवा करण्याची संधी दिली. आम्ही ‘कलम ३७०’ जमिनीत गाडले आहे. या कलमाने जम्मू आणि काश्मीर देशापासून वेगळे ठेवले, आतंकवादला प्रोत्साहन दिले. आज काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा डौलाने फडकत असून दिवाळी तिथे साजरी झाली. सात दशक जी भाषा पाकिस्तान बोलत होती ती भाषा आज काँग्रेस बोलत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ‘कलम ३७०’ लागू करण्याची भाषा काँग्रेस बोलत असून ते देश किंवा महाराष्ट्र सहन करणार नाही.

पुणे आणि भाजप यांचा संबंध विचार, संस्कार, आस्था असा आहे. महायुती सरकार आगामी काळात वेगाने विकास करेल. पुण्याची पुढील पाच वर्षे विकासाची नवीन उड्डाण करण्याची असतील. परकीय गुंतवणुकीमध्ये देशात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक झाली असून गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात या भागात नवी गुंतवणूक होत असून स्टार्टअपद्वारे तरुणांना लाभ मिळाला आणि रोजगारनिर्मिती झाली. पुण्याचा ऑटोमोबाईल क्षेत्र वेगळी ओळख आहे. नागरिकांची स्वप्ने आणि आवश्यकता या माझ्या ऊर्जा आणि योजना कामाचा आधार आहे. पुण्यात मेट्रो जाळे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होईल. रिंगरोड, मीसिंग लिंक प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पालखी मार्ग देखील वेगाने निर्माण होत असून ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही समर्पित सेवा आहे. महायुती पूर्वी जे सरकार राज्यात होते, त्या आघाडीला सांगण्यासारखे काही विकास प्रकल्प नव्हते. विकासासाठी एकच विकल्प आहे, महायुती आहे तरच राज्याची गती आणि प्रगती आहे.

‘मविआ’च्या घोषणा विकासविरोधी - अजित पवार

यावेळी अजित पवार म्हणाले, नेहमी पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. देशात मोदी सरकार दूरदृष्टी ठेवून गतीने विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकासाचा वेग गतीने वाढवला जाईल. राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. सरकारला मिळणाऱ्या निधीपैकी निम्मा निधी शासकीय पगारावर जातो आणि बाकी निधी विकास कामास वापरला जातो. पण आघाडी सरकारने ज्या घोषणा केल्या त्यासाठी तीन लाख कोटी रुपये लागत असून ते राज्याचा विकास कसा साधणार, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशातील सर्वाधिक भेटी पुण्याला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. काँग्रेसने देशात गरिबी हटवली नाही, पण मोदी सरकारने दहा वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेवर आणले. विमानतळ संख्या १५७ पर्यंत वाढवली. नवे १६ एम्स सुरू करण्यात आले. दिवसाला २८ किमी नवे रस्ते तयार होत आहे. अयोध्या राम मंदिर तयार झाले, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले गेले. दहा वर्षांत महाराष्ट्रासाठी दहा लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून दिले गेले आहे. साडेसात हजार कोटी रुपये राज्यातील साखर कारखान्यांना मदत दिली गेली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगात एका क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण साहित्य आपण सुरुवातीला आयात करत होतो, पण आता एक लाख कोटींचे संरक्षण साहित्य निर्यात केले आहे. पुण्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्हा महायुती सरकार येण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची अनेक वर्षे मागणी झाली, पण काँग्रेसने कधी त्याची पूर्तता केली नाही. आम्ही हे काम करून आमची जबाबदारी निभावली आहे. विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. वीर सावरकर यांना सतत ते शिव्या देतात. आघाडीला मी आव्हान देतो की, राहुल गांधी यांच्या तोंडून त्यांनी वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी ‘मविआ’ला दिले.

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

ठाण्यात महायुतीतील उमेदवारांचे टेन्शन वाढले?घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रचाराला मारली दांडी

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत