महाराष्ट्र

पंकजा, धनंजय मुंडे यांनी धाक दाखवून आपली कोट्यवधी रुपयांची जमीन हडपली; सारंगी महाजन यांच्या आरोपाने खळबळ

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राज्यातील मंत्री धनंजय मुंडे या बहीण-भावांनी कारस्थान रचून आणि धाक दाखवून आपली कोट्यवधी रुपये किमतीची जमीन हडपली, असा गंभीर आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राज्यातील मंत्री धनंजय मुंडे या बहीण-भावांनी कारस्थान रचून आणि धाक दाखवून आपली कोट्यवधी रुपये किमतीची जमीन हडपली, असा गंभीर आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथे गट क्रमांक २४० मधील कोट्यवधी रुपये किमतीची ३६.५० आर जमीन पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी जबरदस्तीने घेतल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. आता या आरोपांबद्दल पंकजा आणि धनंजय मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तोंडावर झाले आरोप

धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे परळी विधानसभेची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तोंडावर सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

पंकजा-धनंजय यांची दहशत

मी एवढंच सांगते आहे की मी न्यायालयाच्या चकरा मारते आहे. मी पोलीस स्टेशनला गेले होते. तक्रार केली होती, पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. आता मी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. त्यांनी जर कारवाई केली नाही तर मी न्यायालयात दावा करणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण-भाऊ आणि त्यांचे बगलबच्चे यांनी मला त्रास दिला. मला किंवा माझ्या मुलांना काही झाले तर हे दोघेच त्याला जबाबदार असतील. या दोघांनीही दहशत माजवली आहे. मी दोन वर्षे पाठपुरावा केला आहे. त्यातून मला या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत. आता मी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.

आपण राजकीय हेतूने वगैरे काहीही आरोप केलेले नाहीत. मी राजकारणात नाही, आत्ताही राजकारण करत नाही. पंकजा आणि धनंजय हे दोघे बहीण-भाऊ यांना सगळे आयते मिळाले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण यांच्यापेक्षा अनेक पटीने चांगले होते, असेही त्या म्हणाल्या.

अनुसुया हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि...

परळीमध्ये आपली ६३.५० आर जमीन होती, ३६ आर जमीन फसवणूक करून विकली, आपल्याला परळीच्या अनुसुया हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले आणि तेथून रजिस्ट्रार कार्यालयात नेण्यात आले आणि आपली स्वाक्षरी घेतली. जमीन कोणी घेतली ते आपल्याला माहिती नाही. त्यानंतर गोविंद बालाजी मुंडे या व्यक्तीने आपल्याला घरी नेले आणि जेवण दिले व कोऱ्या कागदावर सह्या करण्यास सांगितले. तेव्हा त्याला आपण विरोध केला. सही केली नाही तर धनुभाऊ तुम्हाला परळी सोडू देणार नाहीत, अशी धमकी गोविंद यांनी दिली, असे सारंगी महाजन म्हणाल्या. गोविंद याने नंतर आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले आणि आमच्याकडून एक लाख रुपये घेतले, असे त्या म्हणाल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी