महाराष्ट्र

४ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी आला आणि… ; परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

दत्ता पवार जवळपास १३ महिने कारागृहात होता. जामिनासाठी कोणीही पुढे न आल्याने मोफत विधी सेवा अंतर्गत चार दिवसांपूर्वीच वैयक्तिक बाँडवर त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.

Krantee V. Kale

परभणी : परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना केल्याच्या प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दत्ता पवारला १३ महिन्यांनंतर, चार दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. त्याने आज अचानक आपल्या मिर्झापूर गावातील शेतातल्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना केल्याप्रकरणी दत्ता पवारला अटक करण्यात आली होती. १० डिसेंबर २०२४ रोजी घडलेल्या या घटनेनंतर परभणी शहरात मोठे आंदोलन झाले होते आणि देशपातळीवरही या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. या प्रकरणात दत्ता पवार जवळपास १३ महिने कारागृहात होता.

जामीन मिळाल्यापासून गावीच होता

जामिनासाठी कोणीही पुढे न आल्याने मोफत विधी सेवा अंतर्गत चार दिवसांपूर्वीच वैयक्तिक बाँडवर त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन मिळाल्यानंतर तो आपल्या मूळ गावी मिर्झापूर येथे आला होता आणि दोन-तीन दिवसांपासून तिथेच राहत होता. मात्र, सोमवारी सकाळी त्याने शेतातील खोलीत आत्महत्या केल्याचे समोर आले.

का उचललं टोकाचं पाऊल?

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे. दत्ता पवारची पत्नी आणि दोन मुले पुण्यात राहतात, तर इतर नातेवाईक परभणी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आहेत. पोलिसांनी सर्व नातेवाईकांना घटनेची माहिती दिली असून ते मिर्झापूरकडे रवाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कुटुंबापासून दुरावलेपणा आणि मानसिक तणाव यामुळे तो नैराश्यात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारागृहात असतानाही त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. तथापि, दत्ता पवारने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

ठाण्यात भाजपला डावलल्याचा आरोप; 'सात प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन करा', आयुक्तांना पत्र

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video

कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार; ३२०० कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Bhayandar : लग्नाच्या रिसेप्शनला न गेल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेला मुलगा चाकूचा वार लागून ठार