महाराष्ट्र

पूजा खेडकरला मोठा झटका! अटकपूर्व जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होणार?

Swapnil S

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची ‘यूपीएससी’ने उमेदवारी रद्द केल्यानंतर आता दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजाने अटक टाळण्यासाठी धावाधाव करण्यास सुरुवात केली असून तिने आता दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी बुधवारी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात झाली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. पूजाच्या वकिलांनी तिला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जोरदार युक्तिवाद केला. पूजाने कोणतीही फसवणूक केलेली नाही, पूजाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अयोग्य कसे ठरते? पूजा महिला असल्याने तिला त्रास दिला जात असल्याचा दावा तिच्या वकिलांनी कोर्टात केला.

सरकारी वकिलांनी या प्रकरणात बऱ्याच बाबींची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. पूजाने किती वेळा नाव बदलून परीक्षा दिल्या, यासह अनेक बाबींची चौकशी होण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी तसेच ‘यूपीएससी’च्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी सदर प्रकरणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते.

‘यूपीएससी’ने बुधवारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याची कारवाई केली. ‘नागरी सेवा परीक्षा २०२२’चे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजाची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली. पूजा हिला भविष्यात ‘यूपीएससी’ची परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली असून निवडीवरही बंदी घालण्यात आली आहे. ‘यूपीएससी’ने जाहीर केलेल्या माहितीनुसार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिने ओळख लपवून ‘यूपीएससी’ची परीक्षा दिली. परीक्षेसाठी असलेल्या प्रयत्नांची मर्यादा पूजाने विविध पळवाटा काढून बेकायदेशीररीत्या ओलांडल्याचेही ‘यूपीएससी’ने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात ‘यूपीएससी’ने पूजा खेडकर हिला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. २५ जुलैपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास पूजाला सांगण्यात आले होते, मात्र पूजाने ४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. पूजाची ही मागणी ‘यूपीएससी’ने अमान्य केली, मात्र उत्तर सादर करण्याची मुदत २५ ऐवजी ३० जुलै करण्यात आली होती. उत्तर सादर करण्यासाठीची ही शेवटची संधी असल्याचेही म्हटले होते. मुदतीत प्रतिसाद न दिल्यास कारवाई करण्यात येईल, असे पूजाला स्पष्टपणे सांगण्यात आले होते.

दरम्यान, पूजा खेडकरांची बाजू अ‍ॅड. माधवन यांनी मांडली. त्यांनी म्हटले की, पूजाविरोधात जी कलमे लावली आहेत, त्यानुसार तिला अटक होण्याचा धोका आहे. पूजाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. तिच्यावर नाव बदलण्याचा आरोप आहे. मात्र, तिने नाव बदलल्याचे गॅझेट काढले आहे. खोटे अपंगत्व प्रमाणपत्र घेतल्याच्या आरोपावर युक्तिवाद करताना पूजाच्या वकिलांनी म्हटले की, पूजा यांना दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे एका डॉक्टरने दिलेले नाही तर आठ डॉक्टरांनी दिले आहे. हे प्रमाणपत्र ‘एम्स’ बोर्डाकडून देण्यात आले असून, या प्रमाणपत्राची मूळ प्रत ‘यूपीएससी’कडे सादर करण्यात आली असल्याने ही फसवणूक कशी ठरते, असा सवाल पूजाच्या वकिलांनी विचारला.

सरकारी वकील अ‍ॅड. श्रीवास्तव हे युक्तिवाद करताना म्हणाले की, पूजा खेडकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली आहे. पूजाने अशी माहिती लपवली की ज्यामुळे तिला परीक्षेला बसण्यापासून वंचित केले गेले असते. पूजाने वारंवार आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच तिची चौकशीची गरज आहे. त्यामुळे कोठडी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. पूजाला जर अटकपूर्व जामीन दिला तर ती चौकशीत सहकार्य करणार नाही, असेही सरकारी वकिलांनी सांगितले.

नियमांची कल्पना असूनही गैरकृत्य केले

पूजा खेडकर हिला आपण बनावट कागदपत्रे बनवली असून त्या आधारे ‘यूपीएससी’ची परीक्षा तिने दिल्याचे माहिती होते. पूर्ण शुद्धीत असताना तिने हे कृत्य केले आहे. ‘यूपीएससी’च्या नियमावलीत हे स्पष्टपणे लिहिले आहे की, जर तुम्ही बनावट कागदपत्रे सादर केली तर तुमची उमेदवारी रद्द होईल, तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे हे सर्व प्रकरण पाहता तिला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलाने केली.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला