महाराष्ट्र

पवार कुटुंबीय लागले कामाला! वडिलांसाठी जय पवार सक्रिय, अजित पवारांचे पुतणे शरद पवारांसोबत

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीत सक्रिय झाले

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. कारण बारामतीत थेट पवार कुटुंबातच फूट पडल्याने आता कोण काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आपल्याला एकाकी पाडले जात असल्याचा आरोप केला होता. त्याची प्रचिती बुधवारी आली. कारण अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना पाठबळ देण्याचे संकेत दिले, तर गुरुवारी अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार बारामतीत सक्रीय झाले. त्यांनी मात्र कुटुंबाला एकटे पाडल्यासारखे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. एवढेच नव्हे, तर बारामतीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पक्षफुटीचा कुठलाही परिणाम जाणवत नसल्याचे म्हटले. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने आक्रमक पवित्रा घेऊन थेट शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांचे बारामतीतील कार्यक्रम वाढले असून, सातत्याने कुठे ना कुठे सभा घेऊन त्यांचा हल्लाबोल सुरू आहे. परंतु शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने गाठीभेटीवर भर देऊन पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन्ही गट आता चांगलेच कामाला लागल्याचे दिसत आहे. परंतु एकीकडे अजित पवार आक्रमक झालेले असताना शरद पवार गट मात्र, संयमाने कामाला लागला आहे. अजित पवार यांनी अद्याप उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट केलेले नाही. परंतु सध्या तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच मैदानात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने बारामती दौऱ्यावर येत आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबतच छोटे चिरंजीव जय पवारही आता बारामतीत सक्रिय झाले आहेत. जय पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवनला भेट देऊन सोशल मीडियाच्या टीमची नेमणूक केली. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना आम्हाला बारामतीत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येथे फुटीचा कुठेही परिणाम दिसून येत नाही. आपण सातत्याने लोकांच्या भेटी घेऊन लोकांच्या समस्या अजितदादांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे. यापुढेही लोकांच्या सर्व समस्या मांडून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. यासोबतच त्यांनी कुटुंबात एकटे पाडले जात असल्यासारखे कुठेही वाटत नाही. अद्याप आमचा उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवार जाहीर केल्यावर खरे चित्र सर्वांच्या समोर येईल. सध्या दादांनी आम्हाला फक्त आपला प्रचार करायला सांगितले आहे. या अगोदरही मी प्रचार केला आहे. त्यामुळे आताही आम्ही कामाला लागलो असून, जनतेतून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जय पवार यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी