महाराष्ट्र

लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार-गणेश नाईक

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही.

Swapnil S

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. या सरोवरातील पाणी उपसा करण्यासाठी वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक असून त्यासाठी शुक्रवारी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सिद्धार्थ खरात यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. पाणी उपसा करण्यासाठी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. मात्र, वन्यजीव विभाग आणि पुरातत्व विभागात समन्वय नसल्याने पाणी उपसा रखडले आहे. त्यामुळे या परिसरात असलेले गायमुख, रामगया, पापहरेश्वर मंदिर, कमलजा मंदिरासह सहा मंदिरे पाण्याखाली गेली असल्याचे खरात यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना नाईक म्हणाले, “यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील झरे मोकळे झाले आहेत. त्यामुळे लोणार सरोवराची पाणी पातळी २० ते २५ फूट वाढली. त्यामुळे इथली मंदिरे दर्शनासाठी खुली नाहीत. यासंदर्भात आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून तातडीने वन्यजीव विभागाची परवानगी घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात येईल.” तसेच या परिसराच्या विकासासाठी ४३४ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून त्यापैकी १६८ कोटी खर्च झाला आहे.

सिद्धार्थ खरात आक्रमक

लोणार सरोवर आणि संवर्धन समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नसल्याबाबतही सिद्धार्थ खरात यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला नाईक यांनी उत्तर दिले नाही. शिवाय अध्यक्षांनी पुढील लक्षवेधी पुकारली. त्यामुळे खरात आक्रमक झाले. मला बोलायला देत नाही, मला निलंबित करा, असा पवित्रा खरात यांनी घेतला. त्याला सुनील राऊत, महेश सावंत, अमित देशमुख, कैलास पाटील, ज्योती गायकवाड यांनी उभे राहून पाठिंबा देत त्यांना बोलायला देण्याची विनंती अध्यक्षांना केली. अखेर अध्यक्षांनीच यासंदर्भात गणेश नाईक यांना सूचना केली. त्यावर सिद्धार्थ खरात यांचा लोकप्रतिनिधींच्या समितीत समावेश करण्यासाठी शिफारस केली जाईल, असे नाईक म्हणाले.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल