सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा आज विधानसभेत मोठ्या गांभीर्याने उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे तपशील मांडत संपूर्ण घडामोडींवर प्रकाश टाकला.
हातावरील अक्षर तिचंच असल्याची फॉरेन्सिक पुष्टी
ऑक्टोबरमध्ये या डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने प्रशांत किसन बनकर आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गोपाल बाळासाहेब बदने यांची नावं नमूद केली होती. या दोघांवरही तिने छळ, अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते.
फडणवीस म्हणाले, "फॉरेन्सिक अहवालानुसार तिच्या हातावर लिहिलेलं अक्षर तिचंच आहे. लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं. दुसऱ्या आरोपीनेही फसवणूक केल्याचं सत्य तपासात आलं आहे." तपासात तिचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याची पुष्टीही झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सॲप चॅट्स, सर्व डिजिटल पुरावे जप्त
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सअॅप चॅट्स, सर्व संदेश आणि ट्रेल आम्ही ताब्यात घेतले आहेत. हॉटेलमध्ये कोण येत-जात होतं त्याचा संपूर्ण मागोवा घेतला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आम्ही ६० दिवसांत चार्जशीट दाखल करतो. या प्रकरणातही चार्जशीट अंतिम टप्प्यात आहे.” या प्रकरणात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास एका महिला IPS अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे.
'लाडकी बहीण' योजनेशी तुलना अयोग्य - फडणवीस
काहींनी या प्रकरणाचा संदर्भ ‘लाडकी बहीण’ योजनेशी जोडल्यावर फडणवीस म्हणाले, "सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडणं अयोग्य आहे. सुरक्षा हा वेगळा विषय आहे. दोन गोष्टींची तुलना करणं योग्य नाही." अडीच कोटी महिलांनी ही योजना स्वीकारली असून, सरकार योजना सुरू ठेवणार आणि महिला सुरक्षेलाही तितकंच प्राधान्य देणार, असे ते म्हणाले.
नेमकी घटना काय?
ऑक्टोबरमध्ये फलटणच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. तिच्या तळहातावरील नोटमुळे छळ आणि लैंगिक शोषणाचे आरोप उघड झाले. शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळफासामुळे झाल्याचे नमूद आहे. यानंतर प्रकरण राज्यभर चर्चेत आले आणि आता विधानसभेतही त्यावर तपशीलवार चर्चा झाली. सरकारकडून या प्रकरणाचा न्यायाधीशांकडून स्वतंत्र तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची हमी फडणवीस यांनी दिली आहे.